स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या, विधिमंडळात पहिल्यांदाच मागणी; चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सातत्याने केली जाते. विशेष म्हणजे देशात गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करणारे सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्या हिंदुत्त्ववादी विचारांवर चालणारे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. मात्र, अद्यापही विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न (Bharatratna) पुरस्कार मिळालेला नाही, त्यामुळे विविध संघटनांकडून ही मागणी केली जाते. विशेष म्हणजे आरएसएसच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्न पुरस्कारावरुन भाष्य केलं होतं. त्यातच, आज विधानपरिषदेत यासंदर्भात मागणी करण्यात आली हे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावं, यासाठी आपण ठराव करावा आणि तो एकमताने संमत करून घ्यावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

भाजप नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत सावकरांना भारतरत्न देण्याबाबत मागणी केली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. संसदीय कार्यमंत्री यांनी असा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवावा, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. त्यावर, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. आम्ही हा ठराव सभापती महोदयांकडे मांडू आणि त्यांनतर आपण निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले. शासनाने प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव आणतो पण तो सभागृहातही आणावा लागेल. त्यानंतर सभापती महोदय आपण निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, महाराष्ट्र विधिमंडळातून आता सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबत कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येते.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारसीची गरज नसल्याचा खुलासा यापूर्वीच केंद्र सरकारने केला होता. अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हा महत्त्वाचा खुलासा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 2019 मध्येच केला होता. केंद्राकडे भाररत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारसी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता नाही. शिफारशी शिवाय देखील हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न देण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारतरत्न पुरस्काराचे महत्त्व वाढेल

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपलं मत मांडलं आहे. स्वा. सावरकरांना भारतरत्न मिळाल्यास त्या पुरस्काराचं महत्व वाढेल, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली होती.

हेही वाचा

अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही

आणखी वाचा

Comments are closed.