दात तुटला, चेहरा विद्रूप झाला… मुंबईच्या क्लबमध्ये प्रीत सिंगसोबत नेमकं काय घडलं? न्यायासाठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोडला टाहो

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओटीटीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला X6’ मधील माजी स्पर्धक प्रीत सिंग हिच्यावर मुंबईतील एका नामांकित क्लबमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आणि जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आपल्या पोस्टमध्ये प्रीतने या घटनेचा सविस्तर माहिती दिली आहे. तिने सांगितले की, ती तिच्या मैत्रिणीसोबत मुंबईतील एका क्लबमध्ये गेली असताना एका महिलेने तिथे येऊन त्यांच्याशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. काहीवेळाने या वादाने हिंसक रूप घेतले. क्षुल्लक गोष्टींवरून सुरू झालेला हा वाद हिंसक वळण घेईल, याची कल्पनाही प्रीतला नव्हती. त्या महिलेसोबत असलेल्या एका पुरुष मित्राने मध्यस्थी करण्याऐवजी थेट प्रीतवर हात उचलला आणि तिला मारहाण केल्याचे प्रीतने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

या मारहाणीत प्रीतला गंभीर दुखापत झाली असून तिचा एक दातही तुटला असल्याचे प्रीतने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. चेहऱ्यावर सूज आणि जखमा असलेल्या अवस्थेत तिने व्हिडिओ बनवून आपला संताप व्यक्त केला आहे. प्रीतने असा दावा केला आहे की, संबंधित महिला ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे, मात्र तिने अद्याप कोणाचेही नाव जाहीर केलेले नाही. तिथल्या इतर लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला, मात्र तोपर्यंत प्रीतला गंभीर इजा झाली होती.

प्रीतच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून तिला पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री फातिमा सना शेख, उर्फी जावेद आणि स्प्लिट्सविलामधील तिच्या सहकाऱ्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. अनेकांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचे आणि आरोपींची नावे समोर आणण्याचे आवाहन केले आहे. ती रात्र आमच्यासाठी भयानक स्वप्नासारखी होती, अशी प्रतिक्रिया तिची मैत्रीण झलक गोहिल हिने दिली आहे.

Comments are closed.