मला स्पर्धेतून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न; विनेश फोगाट हिचा कुस्ती महासंघावर गंभीर आरोप
ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्ती महासंघावर गंभीर आरोप केले आहेत. आगामी नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धेत सहभागी होण्यापासून मला रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा दावा विनेशने केला आहे. यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
पुढील महिन्यात होणारी नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धा ही आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या निवडीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महासंघाच्या 8 एप्रिलच्या परिपत्रकानुसार नोंदणीची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 होती. मात्र, विनेशने नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असता पोर्टल आधीच बंद असल्याचे दिसून आले.
मी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकते, असे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात पोर्टल बंद दाखवत आहे. महासंघाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप विनेशने सांगितले.
विनेशने पुढे म्हटले की, ही स्पर्धा माझ्या पुनरागमनासाठी आणि आशियाई स्पर्धांच्या निवडीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मला स्पर्धेबाहेर ठेवण्यासाठीच हे मुद्दाम केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
दुसरीकडे महासंघाचा आरोप फेटाळला आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले, अशा प्रकारच्या तक्रारी इतर काही खेळाडूंनीही केल्या होत्या. त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवण्यात आले. आम्ही कोणत्याही खेळाडूला स्पर्धेतून रोखत नाही.
कुस्ती, राजकारण आणि पुन्हा कुस्ती
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. या धक्क्यानंतर तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तिने राजकारणात प्रवेश करत हरियाणातील जुलाना मतदारसंघातून निवडणूक जिंकली. मात्र, डिसेंबर 2025 मध्ये तिने पुन्हा कुस्तीच्या मैदानात परतण्याची घोषणा केली.
Comments are closed.