भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याची तयारी
‘सेमीकॉन इंडिया 2026’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन : भारतावरील जगाचा विश्वास वाढत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बदलत्या काळानुसार भारताला सेमीकंडक्टर केंद्र बनवण्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिपादन गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी केले. दिल्लीतील यशोभूमी येथे सेमीकॉन इंडिया 2026 च्या पाचव्या आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था विस्तारत असताना भारतावरील जगाचा विश्वासही वाढत आहे. भारतीय कारखान्यांमध्ये उत्पादित सेमीकंडक्टर चिप्स आता देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत, असे ते म्हणाले.
सेमीकंडक्टर क्षेत्र हे एकाच ठिकाणी सर्व काही देणारे क्षेत्र नसल्याने तांत्रिक क्षमता निर्माण करण्यासाठी अनेक दशके लागतात. तथापि, भारताने चिप डिझाइन, उत्पादन, उपकरण उत्पादन आणि चाचणी क्षमता यावर एकाचवेळी काम केले सुरू केले असून त्यात टप्प्याटप्प्याने यशही मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यावर्षी सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा आणि वाढत्या किमतींचा थेट परिणाम इलेक्ट्रॉनिक्सच्या किमतींवर झाला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये अॅपलने भारतातील काही आयफोन मॉडेल्सच्या किमती 41 टक्क्यांपर्यंत वाढवल्या. याव्यतिरिक्त कार आणि वाहनांसाठी सेमीकंडक्टर चिप्सचा सातत्याने तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील यशोभूमी येथे सेमीकॉन इंडिया 2026 चे उद्घाटन केले. याप्रसंगी, त्यांनी भारतात उपलब्ध असलेल्या नवीन संधी आणि 7.8 जीडीपी वाढीच्या दराविषयीही भाष्य केले. याप्रसंगी त्यांनी युवकांना भारताचा आधारस्तंभ म्हटले. तसेच त्यांनी परदेशातून आलेल्या पाहुण्यांचे भारतात विशेष स्वागत केले. त्यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छाही दिल्या.
जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘एकीकडे आपल्याकडे शतकानुशतके जुनी उत्पादन परंपरा आहे, तर दुसरीकडे आपल्याकडे 21 व्या शतकातील तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी आहे. हीच आमची ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ घडवण्याची प्रेरणा आहे. प्रत्येक नागरिक ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी पूर्ण समर्पण आणि तळमळीने काम करत आहे. जर आपण फक्त गेल्या 15 दिवसांकडे पाहिल्यास भारत विकासाच्या दिशेने किती वेगाने प्रगती करत असल्याचे कोणालाही समजू शकते. याच सप्टेंबर महिन्यात, अवघ्या 10 दिवसांपूर्वी मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आम्ही एजेंटिक एआय, टोकेनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक वित्तपुरवठ्यावर चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
7.8 टक्के जीडीपी वाढीवर भाष्य
सप्टेंबरमध्ये भारताचा तिमाही जीडीपी अहवाल प्रसिद्ध झाला. सध्याच्या कठीण काळातही भारताने 7.8 टक्के वाढीचा दर गाठला आहे. त्याचवेळी, एका जपानी क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे सार्वभौम रेटिंग सुधारले आहे. या वाटचालीतून एकीकडे भारताची अर्थव्यवस्था वाढत असतानाच दुसरीकडे भारतावरील जगाचा विश्वास आणि आत्मविश्वासही सातत्याने वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसते, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने नुकतेच ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले. या जागतिक व्यासपीठावर भारताच्या घोषणापत्राचा एकमताने स्वीकार होणे हा भारतावरील जगाच्या विश्वासाचा आणखी एक मोठा पुरावा असल्याचेही मोदी म्हणाले.
'सेमिकॉन इंडिया 2026' इव्हेंट
‘सेमीकॉन इंडिया’ हा जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उत्पादक आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणणारा एक कार्यक्रम आहे. या माध्यमातून सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीमधील भारताची क्षमता प्रदर्शित होणार आहे. हा तीन दिवशीय कार्यक्रम गुरुवारपासून सुरू होऊन शनिवार, 19 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. याचे आयोजन इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘एसईएमआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. ‘एसईएमआय’ ही सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणारी एक जागतिक संघटना आहे.
Comments are closed.