चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती

संचालकांचा निर्णय, पण ‘टाटा ट्रस्टस्’चा विरोध

अनुभवी नेतृत्व…

  • एन. चंद्रशेखरन यांच्या दोन कालावधींमध्ये टाटा उद्योगसमूहाची मोठी प्रगती
  • पाच वर्षांसाठी चंद्रशेखरन यांची पुन्हा नियुक्ती, पण वादाचे मुद्देही महत्त्वाचे
  • चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला नोएल टाटा या एकमेव संचालकाचा विरोध

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतातील सर्वात मोठा औद्योगिक गट असणाऱ्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी असणाऱ्या ‘टाटा सन्स’ या कंपनीच्या अध्यक्षपदी पुन्हा एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे, अशी घोषणा गुरुवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे. मात्र, ‘टाटा सन्स’चे समर्थन मिळाले असले, तरी या नियुक्तीला टाटा गटाच्या विश्वस्त संस्थांनी (टाटा ट्रस्टस्) विरोध केल्याची माहिती दिली गेली आहे.

यापूर्वी दोन कालावधींसाठी एन. चंद्रशेखरन हेच टाटा सन्सचे आणि टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष होते. तथापि, 12 ऑगस्टला त्यांनी पद सोडण्याची आणि तिसरा कालावधी न घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या अध्यक्षपदासंबंधी टाटा उद्योगसमूहाच्या नियंत्रक सदस्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे आपण पदत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले होते. नंतर त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्रही संचालक मंडळाला सादर केले होते.

त्यागपत्र मागे घेण्याचे आवाहन

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांना अध्यक्षपदाचा तिसरा कालावधी देऊ केला असून तो 5 वर्षांसाठी आहे. टाटा सन्सच्या नियुक्ती आणि मानधन समितीने हा निर्णय घोषित केला. चंद्रशेखरन यांना त्यांचे त्यागपत्र मागे घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे. चंद्रशेखरन यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. आपल्या नियुक्तीसंबंधी एकमत असेल, तरच आपण पदावर राहू असे त्यांनी काही काळापूर्वी स्पष्ट केल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात येते.

नोएल टाटा यांचा विरोध

‘टाटा ट्रस्टस्’चे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे एक संचालक नोएल टाटा यांनी मात्र, टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला होता. विरोध करणारे ते टाटा सन्सचे एकमेव संचालक होते. नोएल टाटा यांचा चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षपदाला विरोध फेब्रुवारीपासून सातत्याने आहे.

नियुक्ती ‘बेकायदेशीर’

चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाने बहुमताने अध्यक्षपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे वक्तव्य टाटा ट्रस्टस्’कडून करण्यात आल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाणार का, अशी चर्चाही होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदर, यासंबंधात एका महिन्याभरात चित्र अधिक स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नोएल टाटा यांचे सासरे आणि शाप्पूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष पालोन एस. मिस्त्री यांनी मात्र चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. शाप्पूरजी पालोनजी समूहाचे ‘टाटा सन्स’मध्ये 18 टक्के समभाग आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेचा निर्णयही महत्त्वाचा

टाटा समूह संबंधात रिझर्व्ह बँकेने केलेला एक निर्णयही महत्त्वाचा मानला जात आहे. एका आठवड्यापूर्वी टाटा सन्सकडून बँकेला एक अर्ज करण्यात आला होता. टाटा समूहाच्या एका बिगर बँक वित्त कंपनीची नोंदणी मागे घेण्याची विनंती या अर्जात करण्यात आली होती. तथापि, रिझर्व्ह बँकेने तो अर्ज फेटाळला होता. या कंपनीचे कर्ज 21 हजार कोटी रुपयांचे आहे. त्याचे रिपेमेंट करण्यात आले आहे. या कंपनीची शेअरबाजारातील नोंदणी एक वर्षभर रखडली आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आर्थिक वर्तुळात बनला होता. या पार्श्वभूमीवर एन. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीसंबंधीच्या घडामोडींकडे पाहिले जात आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडींकडे केंद्र सरकार आणि भारताचे उद्योगजगत यांचे सूक्ष्म लक्ष आहे. टाटा उद्योगसमूह हा भारतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा समूह असल्याने या समूहात घडणाऱ्या घडामोडी उद्योग क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात.

Comments are closed.