पृथ्वी शॉची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड; रणजी ट्रॉफीमध्ये सांभाळणार नेतृत्व

भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ 2026-27 च्या रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील पालम A स्टेडियमवर सर्व्हिसेसविरुद्ध होणार आहे. 2018 मध्ये भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉला नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याला केवळ एका सामन्यासाठी ही जबाबदारी मिळाली आहे.

​भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळणार असल्यामुळे ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचा पहिला रणजी ट्रॉफी सामना खेळू शकणार नाही. उजव्या हाताच्या या फलंदाजाला इंडिया ‘ए’ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो पुडुचेरी येथे 6, 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तीन अनधिकृत एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पृथ्वी शॉबद्दल बोलायचे झाले तर, तो यापूर्वी गायकवाडच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता.

​भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेला पृथ्वी शॉ 2025-26 च्या रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी मुंबई सोडून महाराष्ट्र संघात सामील झाला होता. महाराष्ट्रासाठी आपल्या पहिल्याच हंगामात त्याने 7 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 537 धावा केल्या आणि संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

​सर्व्हिसेस संघाविरुद्धच्या या सामन्यासाठी पृथ्वी शॉव्यतिरिक्त अनुभवी फलंदाज अंकित बावणे, फिरकीपटू विकी ओस्तवाल, अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर आणि वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाडप्रमाणेच अर्शिन कुलकर्णीसुद्धा इंडिया ‘ए’ संघाचा भाग असल्याने तोदेखील या हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही.

​महाराष्ट्राच्या रणजी संघात सौरभ नवाले, सचिन धास आणि ऋषिकेश सोनावणे यांची निवड झाली आहे. बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम यांच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी एकाच वेळी राज्याच्या मुख्य क्रिकेट संघात स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता या तिघांची कामगिरी या रणजी हंगामात कशी राहते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Comments are closed.