‘डोक्यात हवा गेल्या’ची टीका झालेल्या पृथ्वी शॉने दाखवून दिलं ‘शेर अभी जिंदा है’, पहिल्याच सामन्

बुची बाबू ट्रॉफी 2025 पृथ्वी शंभर: काही काळापासून भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉने अखेर आपल्या बॅटमधून दमदार खेळी साकारत पुनरागमनाची चाहूल दिली आहे. चेन्नई येथे सुरू असलेल्या बुची बाबू ट्रॉफी 2025 च्या पहिल्या फेरीत छत्तीसगढविरुद्ध त्याने महाराष्ट्राकडून पहिल्याच डावात शतक झळकावले. शॉने यंदाच्या हंगामाआधीच आपली टीम बदलत मुंबईकडून महाराष्ट्राकडे वाटचाल केली.

2025-26 च्या हंगामात पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे. याआधी तो मुंबई संघासाठी खेळत होता. सुमारे चार वर्षांपासून तो टीम इंडियाच्या बाहेर असून गेल्या वर्षी फिटनेस व शिस्तभंगाच्या कारणास्तव त्याला मुंबई संघातूनही वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला (MCA) NOC मागितली होती आणि ती मंजूर झाल्यानंतर त्याने महाराष्ट्र संघ गाठला.

शॉचा महाराष्ट्रासाठी पहिला ठसा

25 वर्षीय पृथ्वी शॉचा हा महाराष्ट्रासाठी पहिलाच स्पर्धात्मक सामना होता. दमदार सुरुवात करत त्याने फक्त 122 चेंडूंमध्ये शतक झळकावले. शेवटी त्याने 140 चेंडूंमध्ये 111 धावांची चमकदार खेळी करत आपल्या संघाच्या डावाला गती दिली.

पृथ्वी शॉने मुंबईला रामराम का केला?

मुंबई सोडण्याबाबत शॉ म्हणाला होता की, “करिअरच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात खेळल्याने मला अधिक प्रगती करता येईल, असं मला वाटतं. मला अनेक वर्षे संधी आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी मुंबई क्रिकेट संघटनेचा मनापासून आभारी आहे.”

एकेकाळी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लाराशी तुलना

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी कधीकाळी शॉची तुलना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांच्याशी केली होती. 2018 मध्ये त्याने भारताकडून कसोटी पदार्पण करत पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. त्या वेळी त्याच्याकडे भारतीय क्रिकेटच्या पुढील सुपरस्टारकडे म्हणून पाहिले जात होते. मात्र फक्त तीन वर्षांत ग्रह फिरले. सातत्याने अपयश आल्यानंतर 2021 पासून त्याला भारतीय संघाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याची फॉर्म अधिकच खालावली आणि 2025 मध्ये त्याला मुंबई रणजी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एवढेच नाही तर आयपीएल 2025 च्या लिलावातही कोणत्याही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली लावली नाही.

हे ही वाचा –

Ruturaj Gaikwad : ‘हा’ आहे मराठमोळ्या ऋतुराजचा दुसरा अवतार! फक्त फलंदाजी नाही, आता गोलंदाजीतही कमाल, पाहा विकेटचा भन्नाट VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.