कॉरिडॉर बाधितांचा पंढरपूर नगरपरिषदेवर मोर्चा; भूसंपादनाच्या ठरावाला नगरपरिषदेची स्थगिती
पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पंढरपूर कॉरिडॉरच्या भूमी संपादनाच्या विषयाला स्थगिती देण्यात आली. हा ठराव नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घेवू नये, या मागणीकरीता पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने मोर्चा काढून नगरपरिषदेच्या गेटवर ठिय्या मांडला. ‘पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा’, ‘प्राचीन पवित्र पंढरपूरचा विध्वंस नको’, ‘कॉरिडॉर सरकारी जागावरच करा’, ‘नो डीपी नो कॉरिडॉर, पवित्र पंढरी हाच निर्धार’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पंढरपूर कॉरिडॉरबाधितांनी आज सकाळी 9 वाजता नामदेव पायरी येथून कॉरिडॉरबाधित भागातून मोर्चा काढला. सकाळी दहा वाजता नगरपरिषदेच्या गेटवर मोर्चा दाखल झाला.
तीर्थक्षेत्र बचाव समितीने म्हटले आहे की, कोणीही मागणी न केलेला पंढरपूर कॉरिडॉर हा प्रकल्प नोकरशाहीने एसी केबिनमध्ये बसून नकाशावर रेघा ओढून केलेला आहे. तो पूर्णतः फालतूपणाचा आहे. यात गर्दीचे केंद्रीकरण होत आहे. हे धोकादायक आहे. ज्या गोष्टी मंदिरापासून दूर अंतरावर केल्या तरी चालणार असले, तरी त्या निष्कारण मंदिर परिसरात आणत आहेत. वारकरी संघटना सातत्याने मागणी करत असलेल्या पाईक संघाच्या विकास आराखडय़ास शासन दाबून ठेवत आहे. मात्र, नको ते प्रकल्प कॉरिडॉर नावाखाली लादत आहे.
पंढरपुरात सरकारच्या अनेक मोकळ्या जागा असून, त्या ठिकाणी कॉरिडॉर करावा, हे सोडून राज्यकर्ते या जागा आपल्या बगलबच्चांच्या घशात घालण्याच्या कारस्थानात मग्न आहेत. जिथे मठ मंदिरांचा समावेश असलेले, वारकरी भक्तांची पुरातन निवासस्थाने असलेले, वारसा प्राप्त हेरिटेज इमारती, पाडण्याचे कारस्थान होत आहे.
या मोर्चामध्ये बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष माउली महाराज गुरव, गणेश लंके, वैभव बडवे, वीर महाराज, व्यंकटेश गलगलकर, बाळासा डिंगरे, सुलभा वट्टमवार, आगरवाल, डॉ. प्राजक्ता बेणारे यांच्यासह महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटनेते भागवत महाजन-बडवे, नगरसेवक लक्ष्मण शिरसट, नागेश भोसले, फत्तेपूरकर, घाडगे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवकांनी बचाव समितीचे निवेदन स्वीकारून मदतीचे आश्वासन दिले.
नगरपरिषदेत कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय तहकूब
पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारणसभेत कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय ऐनवेळी घेण्यात आला. कॉरिडॉरबाबत नगराध्यक्ष व 40 नगरसेवकांसह कोणालाही विश्वास घेतले नाही. कॉरिडॉरबाबत स्पष्ट माहिती दिली नाही. धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांनी कॉरिडॉर भूसंपादनाला विरोध दर्शवत विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी भूसंपादनाचा विषय तहकूब केल्याचे जाहीर केले.
गोशाळेला जागा देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला अद्ययावत गोशाळा उभारण्यासाठी तीन हेक्टर जागा देऊ केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाला भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध दर्शविला. आज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी भाजप नगरसेवकांनी गोशाळेचा विषय मांडत नगराध्यक्षा व प्रशासनाला धारेवर धरले. तसेच मंदिरे समितीने शहराबाहेर इतर जागेत गोशाळा उभारावी. यमाई तलाव हा शहरवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. येथे वॉटरपार्क उभारण्यात यावा. नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी लावून धरली.
पंढरपूर कॉरिडॉरला बाधितांचा मोठय़ा प्रमाणात पाठिंबा आहे. हा शासनाने पसरवलेला भ्रमाचा भोपळा आज फुटला. पंढरपूर कॉरिडॉरला केवळ दोन-चार लोकांचा विरोध आहे, असे विधान पालकमंत्री गोरे यांनी केले होते. त्याला आज बचाव समितीच्या मोर्चातून सणसणीत चपराक मिळाली.
– अभयसिंग इचगावकर, अध्यक्ष, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती
Comments are closed.