बहिणीचं भाऊ ऐकेल, तुम्ही अजित दादांना सांगा; मुंबईत आंदोलक शिक्षकांची सुप्रिया सुळेंकडे मागणी;
मुंबई: आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्या होत्या. आझाद मैदानावर राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करत आहेत. त्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिक्षकांनी सगळं तुमच्या भावाच्या म्हणजेच अजित दादांच्या हातात आहे, बहीणीचं भाऊ ऐकेल. तुम्ही तुमच्या भावाला आधी सांगा ते मागण्या मान्य करतील असं सुप्रिया सुळे यांना म्हटलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा भाऊ जरी अर्थमंत्री असला तरी सरकारचा अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत निर्णय घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हाय हाय असं सुप्रिया सुळे (सुप्रिया सुले) यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं की, आज शिक्षकांच्या मागण्यासाठी विधान भवनात जाते सरकारची चर्चा करू. जर काही निर्णय घेत नसतील तर मी उद्या दिवसभरात तुमच्या सोबत असेल, असंही सुळेंनी म्हटलं. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी आमदार रोहित पवारांना देखील या प्रश्नाबाबत विधानभवनात बोलावं यासाठी फोन लावला. रोहित पवार विधानभवनात आहेत, त्यांना मी याबद्दल सांगणार सरकारशी बोल असं सांगते असंही त्या म्हणाल्या. मी दोन-तीन शिक्षकांना सोबत घेऊन विधानभवनात जात आहे. उद्या मी शरद पवारांची तुमची भेट घालून देते, शांततेच्या मार्गाने चर्चेला बसुया असंही पुढे सुळेंनी म्हटलं आहे. तुमच्या सुखदुःखांना सरकारला वेळ नाही. आज शरद पवार रायगडमध्ये आहेत. आपल्याला या विरोधात लढावं लागणार आहे. आझाद मैदानावर बसून काही होणार नाही. मागणी मान्य नाही झाले तर विधानभवनात येईल असंही पुढे सुळेंनी शिक्षकांशी बोलताना म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
शाळांना 20 टक्के टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात अद्याप एकाही शाळेला निधी मिळालेला नाही. तसेच अधिवेशनात यासाठी पुरवणी मागणीही मांडलेली नाही. परिणामी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व संबंधित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सर्व शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समन्वयक संजय डावरे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने तातडीने शाळांना टप्पा अनुदान वितरित करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.