राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने.
महिला आरक्षण विधेयकावरुन भाजपचा हल्लाबोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याने संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाने आता काँग्रेसविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची योजना सज्ज केली आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर शनिवारी प्रचंड मोर्चाचे आयोजन केले. या पक्षाच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी, बांसुरी स्वराज आणि कमलजीत सेहरावत यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. हजारो महिलांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी सादर झालेले विधेयक पुरेशा बहुमताअभावी अयशस्वी ठरले.
मतदारसंघ परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत नेणे आणि या 850 जागांपैकी एक तृतियांश जागा महिलांसाठी आरक्षित करणे, तसेच महिला आरक्षण 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच लागू करणे, ही उद्दिष्ट्यो साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने तीन विधेयके लोकसभेत सादर केली होती. त्यापैकी एक घटनादुरुस्ती विधेयक होते. ते संमत होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. मात्र, विरोधी पक्षांनी सहकार्य न केल्याने सत्ताधारी आघाडीला ते गाठता आले नाही. यामुळे भारतीय जनता पक्षाला विरोधकांच्या विरोधात एक मोठा मुद्दा हाती लागल्याचे दिसून येत आहे. आता भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी व्यापक आंदोलनाची योजना केली आहे.
महिलांचा विश्वासघात
केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देण्याची पूर्ण सज्जता केली होती. तथापि, विरोधकांना महिला आरक्षण नकोच होते. त्यामुळे त्यांनी थातूरमातूर कारणे दाखवत या योजनेला विरोध केला. परिणामी, महिलांचा विश्वासघात झाला असून या विश्वासघाताला काँग्रेस उत्तरदायी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील खासदार बांसुरी स्वराज यांनी केली. केवळ काँग्रेसच नव्हे, तर प्रत्येक विरोधी पक्षाने देशातील समस्त महिलांवर अन्याय केला आहे. केंद्र सरकारने योग्य विचार करुन विधेयके सादर केली होती. परिसीमनामुळे कोणत्याही राजकीय पक्षाची हानी होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तरीही, केवळ महिलांना संधी मिळू नये, म्हणून या विधेयकांना विरोध करण्यात आला. आता देशातील महिला विरोधी पक्षांना सोडणार नाहीत. विरोधकांना त्यांच्या कृतीची किंमत भोगावी लागेल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्ली येथे शनिवारी केली आहे.
विरोधकांवर घणाघात
महिला आरक्षण विधेयकावरील काँग्रेसच्या नकारात्मक भूमीकेवर टीका होत आहे. महिलांना देशाच्या धोरणनिर्मितीत महत्वाचे योगदान करता येऊ नये. त्यांना त्यांचे न्याय्य अधिकार मिळू नयेत, त्यांची भूमिका केवळ निवडणुकीच्या दिवशी मतदानकेंदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्या, एवढीच असावी, असे काँग्रेसला मनोमन वाटते. त्यामुळेच एका क्रांतीकारी विधेयकाला हा पक्ष विरोध करीत आहेत, असा घणाघात भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी केला असून हे प्रकरण विरोधकांची केंडी कर्रा शकेल, अशी स्थिती असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे.
इतर राज्यांमध्येही भाजप रस्त्यांवर
दिल्लीप्रमाणे इतर राज्यांमध्येही भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात महाराष्ट्रातही आंदोलन करण्याची योजना सज्ज केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, ही घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही विरोधकांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत महिला विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. या विधेयकांना विरोध करुन विरोधकांनी त्यांची कबर खोदून घेतली आहे, अशी टीकाही अनेक नेत्यांनी केली.
महिला आरक्षण प्रकरण तापणार
ड महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याने भाजप संतप्त
ड विरोधकांच्या विरोधात देशव्यापी आंदोलनासाठी हो पक्ष जोरदारपणे सज्ज
ड विधेयकांना विरोध केल्याचे प्रकरण विरोधकांना भोवण्याची शक्यता व्यक्त
ड विरोधकांना महिलांची नाराजी भोवणार काय, यावर राजकीय वर्तुळात चर्चा
Comments are closed.