Pune : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ, पॅलेस्टाईनचा प्रचार करणाऱ्यांना मारहाण

पुणे : पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरुन गदारोळ माजला आणि त्यानंतर मारहाणीची घटना घडली. BDS या पॅलेस्टिनी समर्थक संघटनेच्या सदस्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. त्याचवेळी त्यांनी ज्यू धर्मियांच्या विरोधात प्रचार सुरू केला. नंतर या ठिकाणी आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्यानंतर हा वाद पेटला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात बीडीएस चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ 8 मे रोजी पत्रक वाटप केली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील कर्वेनगर परिसरात मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बीडीएस (बॉयकॉट, डिवेस्टमेंट, सँक्शन्स) संघटनेचे कार्यकर्ते पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना त्यांनी काही पाश्चिमात्य खाद्य पदार्थांच्या दुकानाबाहेर सुद्धा ठिय्या मांडला होता. तसेच पॅलेस्टाईन समर्थनार्थ त्यांनी काही पत्रक सुद्धा वाटली.

हे आंदोलन सुरू असल्याची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी दोन्ही बाजूने बाचाबाची झाली आणि यात आंदोलनाचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना मारहाण केली. आता याप्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Palestine Protest In Pune : ज्यू धर्मियांविरोधात प्रचार

पॅलेस्टाईन समर्थकांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून सध्या भारत व पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्धसदृष्य परिस्थिती सुरू असताना हे आंदोलन केलं. रस्त्याने, फुटपाथवरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना आकर्षित करून ‘ज्यू लोक निच आहेत. त्यांनी पॅलेस्टाईनमधील लोकांच्या कत्तली केलेल्या आहेत. ज्यू लोकांना सर्वांनी वाळीत टाकायला पाहीजे. त्यांचा निषेध केला पाहीजे’ असं आवाहन केलं.

हमास दहशतवादी संघटनेचे समर्थन केले

या आंदोलकांनी ‘ज्यू’ धर्मातील लोकांच्या भावना दुखावतील असे प्रक्षोभकपणे बोलून, ज्यू आणि इतर धर्मीयामध्ये शत्रुत्व निर्माण होईल अशी व्यक्तव्य केली. हमास सारख्या संघटनेच्या विचार, आचारांना खतपाणी घालून, त्यांचे समर्थन करणारे पोस्टर्स जनतेत वाटून त्यांच्या विचारांचा प्रचार करून, धार्मिक तेढ निर्माण करून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सस्मित राव, कमल शाह, स्वप्नजा लिमकर, ललिता तंगिराला आणि इतर कार्यकर्त्यांवर वारजे पोलिस ठाण्यात कलम भारतीय न्याय संहिता कलम 196, 299, 302, 189(2), 190, 126(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल

पॅलेस्टाईन समर्थकांनी मारहाण केल्यामुळे स्वप्नजा लिमकर यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी या बी डी एस चळवळीच्या कार्यकर्त्या असून त्यांनी कर्वेनगर परिसरात असणाऱ्या डॉमिनोस पिझ्झा बाहेर पॅलेस्टाईन समर्थनार्थ आंदोलन करत असताना काही जणांनी जमाव करून फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. ज्या कार्यकर्त्यांनी पॅलेस्टाईन समर्थकांना मारहाण केली त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात महेश पावळे, सागर धामे, अमित जाधव व इतर यांच्यावर कलम 71, 189(2), 190, 191(2), 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.