नराधम दत्तात्रय गाडे सावज शोधत फिरायचा, ‘सिंगल’ महिला टार्गेटवर; भाजीवाल्या महिलेला शरीरसुखासाठ
पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली होती. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपी दत्ता गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे. दत्ता गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या तपासाच्या दरम्यान आरोपीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दत्ता गाडे स्त्रीलंपट होता, तृतीय पंथीयांशीही संबंध ठेवायचा त्याचबरोबर तो अनेक ठिकाणी एकट्या दिसणाऱ्या महिलांना टार्गेट करायचा अशी माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय गाडे हा प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांवर लक्ष ठेवून त्यांची लुटमार करायचा, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 36) याच्याविरोधात शिरूर व शिक्रापूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि अहिल्यानगरमधील सुपा व कोतवाली पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. या सहाही गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलाच असल्याची माहिती समोर आली आहे, त्यापैकी एक गुन्हा विनयभंगाचा असल्याची माहिती आहे. त्यामुळे गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत असल्याचं, त्याने यापूर्वीही महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तर पोलिसांनी दत्ता गाडे याने आधी कोणत्या महिलांना त्रास दिला असेल किंवा धमकावलं असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
एकट्या दिसणाऱ्या महिलांना करायचा टार्गेट
दत्तात्रय गाडे विरोधात दाखल असलेल्या जुन्या सहाही गुन्ह्यांमध्ये तो एकट्या महिलांना पाहून त्यांच्यावर लक्ष्य ठेवून त्यांची लूटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. बसची वाट पाहणाऱ्या महिलांना आपल्या चारचाकीत बसवून तो निर्जनस्थळी घेऊन जायचा आणि लुटायचा, अशी बाब त्याच्याबाबत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. 2019मध्ये सुपा पोलिस ठाणे (अहिल्यानगर), कोतवाली पोलिस ठाणे (अहिल्यानगर), शिरूर पोलिस ठाणे (पुणे ग्रामीण) येथे गाडेवर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 2020 मध्ये देखील शिरूर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
नगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या तक्रारदार महिला बसची प्रतीक्षा करत असताना गाडे चारचाकी घेऊन तिथे गेला. ‘मी पुण्याला चाललो आहे, तुम्हाला सोडतो,’ असे त्याने तक्रारदार महिलेला सांगितलं. त्यानंतर चारचाकी निर्जनस्थळी नेऊन त्याने पीडितेचा गळा दाबून तिच्याकडील दागिने हिसकावले. नगर बसस्थानकात पुण्याकडे जाणाऱ्या एसटीची वाट पाहणाऱ्या महिलेजवळ येऊन आरोपी गाडेने ‘पुणे, पुणे’ असा आवाज दिला. महिलेने गाडेसोबत जाण्याला होकार दिला, त्या गाडीत बसल्या. त्यानंतर गाडेने काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून महिलेला लुटले.त्याचबरोबर नीरा येथे जाण्यासाठी न्हावरा फाटा येथे थांबलेल्या महिलेपाशी आरोपी गाडे चारचाकी घेऊन गेला. त्याने महिलेला चौफुला येथे सोडण्याचं आश्वासन देऊन चारचाकीत बसवले. त्यानंतर काही अंतरावर चाक पंक्चर झाल्याचं कारण सांगून त्याने कार थांबवून महिलेला धमकावून तिचे दागिने लुटले. याशिवाय एका भाजी विक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर चारचाकी थांबवून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संतापलेल्या भाजी विक्रेत्या महिलेने आरोपीच्या गाडीवर दगड मारल्यावर गाडेने तेथून पळ काढला होता.
तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदवला
स्वारगेट एसटी बसस्थानकात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण 15 दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पीडित तरुणी स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली, त्या कॅबचालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहकाचाही जबाब घेण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल, बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश असेल. या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुटसुटीत आणि न्यायवैद्यक पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.