साखरपुड्यावेळी म्हणाले, तुम्ही फक्त कन्यादान करा, आम्हाला लग्नात काही नको, नंतर कुरकुर अन् मागण

पुणे :  पुण्यात विवाहितेचा हुंड्याच्या छळातून बळी गेल्याची घटना घडली आहे.लग्नाच्याआधी सासरच्याकडून  ‘तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला लग्नात काही नको,’ असे सांगणाऱ्या आयटी इंजिनीअर मुलासह त्याच्या कुटुंबाने हुंड्याच्या (Pune Crime News) हव्यासापायी मुलीचा मानसिक छळ केला. त्यामुळे लग्नानंतर (Pune Crime News) तीन महिन्यांतच तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार १९ फेब्रुवारी रोजी रात्री समोर आला आहे. अंत्यसंस्कारानंतर २६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(Pune Crime News)

गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा.पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हाउसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विवाहितेचा पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१), उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा.पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृताचा पती इंग्लडमध्ये उच्चशिक्षण घेतलेला असून, तो एका कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून काम करतो. (Pune Crime News)

मुलगी आम्हाला आवडल्याने तुम्ही फक्त कन्यादान करा

मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात मुलगा व त्याच्या कुटुंबीयांनी “मुलगी आम्हाला आवडली आहे, तुम्ही फक्त कन्यादान करा; लग्नात आम्हाला काहीही अपेक्षित नाही,” असे सांगितले. या शब्दांवर विश्वास ठेवून दोन्ही कुटुंबांचा साखरपुडा पार पडला. मात्र, फिर्यादींच्या आर्थिक परिस्थितीनुसार देण्यात आलेले आहेर मुलाच्या आईला पसंत पडले नाहीत. “आमचे कुटुंब प्रतिष्ठित आहे, आमचे पाहुणे उच्चभ्रू आहेत; त्यांच्या समोर असा आहेर कसा दिलात?” असे म्हणत मुलीच्या कुटुंबाचा अपमान केल्याचा आरोप आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न निश्चित झाल्यानंतर मुलाच्या कुटुंबाकडून विविध मागण्या सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संशयितांनी कलबुर्गी येथे येऊन महागडे व प्रतिष्ठित मंगल कार्यालय आणि हॉटेल बुक न केल्यास लग्नाला येणार नसल्याची अट घातल्याचा आरोप आहे. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी प्लॉट विकून १ लाख ८० हजार रुपये भरून मंगल कार्यालय आरक्षित केले. लग्नाला मुलाच्या कुटुंबाकडून सुमारे १६० पाहुणे उपस्थित होते. तरीही मंगल कार्यालय पसंत नसल्याचे सांगत पुन्हा अपमानास्पद वक्तव्य केल्याने पाहुण्यांची वेगवेगळ्या हॉटेल व अपार्टमेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली.

लग्नानंतर आठवडाभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गीला आले असता, मुलीने वडिलांना हुंड्यासाठी छळ होत असल्याचे सांगितले. वडिलांनी समजूत काढून तिला सासरी परत पाठवले. ५ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे एका विवाह समारंभात ती वडिलांना भेटली, तेव्हाही तिने सासरच्या त्रासाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, नवविवाहितेने तिच्या मैत्रीण सौम्या हिला फोनवरून होत असलेल्या छळाची माहिती दिल्याचेही समोर आले आहे. “पुढील महिन्यात पुण्यात येऊन भेटतो,” असे वडिलांनी सांगितले होते; मात्र ती भेट अखेरची ठरली. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहत्या इमारतीवरून उडी मारून तिने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.