पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांनी नराधम आरोपीला बेदम चोपले
नसरापुरमधील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच मंगळवारी रात्री पुण्यातील पर्वती पायथा परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱया 50 वर्षांच्या नराधमाला नागरिकांनी बेदम चोप दिला. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात रात्री उशीरपर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण होते.
आरोपी हा चिमुरडीच्या नात्यातील असल्याची माहिती असून तो चिमुरडीसोबत संशयास्पद हालचाली करत असताना काही जणांच्या लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ नराधम आरोपीला पकडून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. पर्वती परिसरातील नागरिकांनी स्वारगेट पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आत्ताच कठोर कारवाई करा, अशी मागणी नागरिक करत होते. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नुकत्याच नसरापूर गावातील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने लोकांची प्रतिक्रिया अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाली.
पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर दुर्दैवी घटना टळली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत नराधम आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Comments are closed.