मोदींचा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला महागात!आयटी कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स भत्त्याला कात्री
आखाती युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याचा सल्ला दिला होता. मोदींचा हा सल्ला आयटी कर्मचाऱयांना महागात पडला आहे. कार्यालयातील अनुपस्थितीच्या नावाखाली काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स भत्त्याला कात्री लावली आहे.
कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना चांगलीच रुजली. कोरोनानंतर बहुतेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम बंद झाले. मात्र आयटी व डिजिटल कंपन्यांनी मध्यममार्ग स्वीकारला. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातील काही दिवस कार्यालयात व तर काही दिवस घरून काम करण्याची मुभा देण्यात आली. अनेक कंपन्या सध्या अशा पद्धतीने काम करतात. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानंतर काही कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची सूट दिली आहे. मात्र यातून एक नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे.
काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा परफॉर्मन्स भत्ता कार्यालयातील उपस्थितीशी जोडला आहे. प्रत्यक्ष कार्यालयात येऊन काम करणाऱ्यांना हा भत्ता दिला जात आहे. तर ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना हा भत्ता नाकारला जात आहे. साहजिकच अनेक कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारावर परिणाम झाला आहे.
आयटी कर्मचारी फोरमचा सवाल
आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयटी कंपन्यांना पंतप्रधानांचा सल्ला खरोखरच मानायचा आहे का, असा प्रश्न ‘आयटी एम्प्लॉइज फोरम’ने केला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे फक्त इंधनाचीच बचत होते असं नाही. तर वेळेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येते व मानसिक फायदाही होतो. खुद्द सरकार डिजिटल इंडिया आणि स्मार्ट कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देत असेल तर कंपन्यांनीही अधिक लवचिकता दाखवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा फोरमने व्यक्त केली.
Comments are closed.