मारणे गँगच्या गुंडाला आठ महिन्यांनी पकडतानाचा पुणे पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल, धंगेकरांनी उडवली
पुणे : कोथरूड परिसरातील एका आईटी इंजिनिअरला मारहाण करून गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देणारा गुंड गजानन मारणे याचा जवळचा साथीदार रुपेश मारणे (Rupesh Marne) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोथरूड पोलिसांनी त्याला मुळशी तालुक्यातील आंदगावातून मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले. दरम्यान, मकोका न्यायालयाने रुपेश मारणे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शिवजयंतीच्या दिवशी संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीतील सदस्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गजा मारणे, रुपेश मारणे (Rupesh Marne) व इतरांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गजा मारणे, रुपेश कृष्णराव मारणे (वय ४०, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी गजा मारणे याच्यासह अनेकांना अटक केली. मात्र, रुपेश मारणे फरार झाला होता. तेव्हापासून रुपेश मारणे फरार होता. कोथरुड पोलिस व गुन्हे शाखेचे पथक रुपेश मारणेचा शोध घेत होते. मात्र, तो गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पोलिसांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर आज माध्यमांशी बोलताना माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी पोलिसांची खिल्ली उडवली आहे.(Pune Crime News)
Ravindra Dhangekar: मला त्याच्याबद्दल हसायला येते
माध्यमांशी बोलताना धंगेकरांनी म्हटलं की, काल आपण एक आरोपी पकडला. पोलिसांनी त्याला एकदम कसा सोपा पकडला. दार उघडलं, ते दार उघडच होतं. एवढा मोठा गुंड दार उघडं ठेवून झोपतो का. ते आत गेले, असं कुठे असतं का? आता मी बोललो तर मग मी वाईट. म्हणून ठरवलं नाही बोलायचं. असा कुठे आरोपी सापडतो का? असा शांतपणे तर आमचा दारुडा पण येत नाही, तो गोंधळ घालत बसतो तिथनं त्याला उचलून आणायला लागतं. हा मस्तपैकी आला, गेला, त्याला सांगून ठेवलं होतं आम्ही मस्तपैकी पोहोचतो तो म्हणाला असेल या या स्वागत करतो. असा आता तो व्हिडिओ आहे की, मला त्याच्याबद्दल हसायला येते. मी बोलायचं नाही ठरवलं आहे पण फिरून तिथेच येतं. असं जायचं चालत चालत दार उघडलं आत गेले आरोपीला घेऊन आले. तिथे तो यांची वाटच बघत बसला होता. कधी येतील हे न्यायला. हा सगळा ड्रामा आहे आता मला पोलिसांवर देखील बोलायचं नाही किंवा कोणावरही बोलायचं नाही. आता मी महिनाभर बोलून थकलो आहे. हे सगळं मला पसंतच नाही. आता पुन्हा बोलावं तरी मग आमचे कमिशनर साहेब चांगलं काम करतात. मग त्यांना परत सगळ्यांचे प्रेशर. मी बोलेन त्याचा त्यांना उत्तर द्यावे लागेल. सगळं व्यवस्थित आहे. ज्या अधिकाऱ्याने त्यांना आणला आहे त्या अधिकाऱ्याला मनापासून शुभेच्छा. आता मला वाटते की माझं तोंडात शिवायला लागेल, असंही पुढे रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
Rupesh Marne : मारणे राहात असलेल्या घराचा दरवाजा वाजवला
रुपेश मारणे हा मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने काल (मंगळवारी, ता २८) पहाटेच्या सुमारास बंगल्याला वेढा घातला. तो पळून जाऊ नये, यासाठी सर्व बाजूने पोलिस अधिकारी व कर्मचारी साध्या वेषात गेले होते. पोलिसांनी रुपेश मारणे राहात असलेल्या घराचा दरवाजा वाजवला. त्यावेळी एका महिलेने दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी घरातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सकाळी अटक करून मकोका कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Rupesh Marne : रुपेश मारणेच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल
रुपेश मारणे हा गजानन मारणे टोळीतील सदस्य आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, व्यावसायिकाचे अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करून ४ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ३ वर्षांपूर्वी गजा मारणे, रुपेश मारणे यांच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई झाली होती. त्यावेळीही रुपेश हा अनेक महिने फरार होता. तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक करण्यात आली होती.
आणखी वाचा
Comments are closed.