बसमध्ये बलात्कार, एसटीचं ‘वस्त्रहरण’; पुण्यातील लेकीबाळी सुरक्षित राहतील याची जबाबदारी कुणाची?

पुणे : स्वारगेट… पुण्यासारख्या शहरातलं महत्त्वाचं बस स्थानक. मात्र या बस स्थानकात उभ्या शिवशाही गाडीमध्ये तरुणीची अब्रू लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपीचं नाव उघड झालं, त्याला अटकही होईल. मात्र या घटनेची व्याप्ती फक्त गुन्ह्याची घटना किंवा त्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईपुरती मर्यादीत नाही. तर हा तुमच्या आमच्या घरातल्या लेकींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. नेत्यांकडून राजकारण सुरू आहे, तोडफोड होतेय. मात्र त्यानं महाराष्ट्राच्या घरातली माय, बहीण आणि लेक सुरक्षित होणार आहे का?

दिवस असो वा रात्र… नेहमीच प्रवाशांची वर्दळ असलेलं बसस्थानक म्हणजे स्वारगेट. याच बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये, 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी सकाळी बलात्कार झाला. या घटनेनं फक्त पुणेच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमनं स्वारगेट बस डेपोचं एक धक्कादायक वास्तव महाराष्ट्रासमोर आणलं.

कंडोम.. महिलांचे कपडे, ही दृश्य पाहिल्यानंतर स्वारगेट स्थानकातल्या जुन्या बसमध्ये कोणते प्रकार चालत असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानंतर बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना स्वारगेट डेपोत धडकली. वसंत मोरेंनी सहकाऱ्यांसह डेपोत तोडफोड सुरू केली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडनं आंदोलन केलं. एबीपी माझाच्या बातमीनंतर वसंत मोरेंनी देखील त्यांचा ताफा जुन्या बसेसकडे वळवला
आणि एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं कैद केलेलं वास्तव नेत्यांनाही दिसलं.

दत्तात्रय गाडे… स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी. पोलिसांनी त्याच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यावर सत्ताधाऱ्यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पण विरोधकांनी मात्र महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय.

स्वारगेटसारख्या डेपोतील बसमध्ये बलात्कार होते ही गोष्ट महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी आहे. मात्र संध्याकाळ उजाडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

बलात्काराच्या घटनेवर सर्वच निषेध व्यक्त करताहेत. खरं तर जेवढा संताप व्यक्त करावा तेवढा कमी आहे. कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या वाढत्या घटना, हिट अँड रन, पबमधील ड्रग्ज सेवन या सारख्या घटनांमुळे बदनाम पुण्यामध्ये आता महिला देखील सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे.

स्वतःला पुण्याचे राजकीय कैवारी म्हणवून घेणारे सर्वपक्षीय नेते याची जबाबदारी घेणार का? पुण्यातली प्रत्येक लेक सुरक्षित राहिल याची जबाबदारी कोण घेणार की नाही?

ही बातमी वाचा:

https://www.youtube.com/watch?v=sodlbiq_1uy

अधिक पाहा..

Comments are closed.