सरकारी आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे, लाडक्या बहिणीची रस्त्यातच प्रसूती

शिरूर येथील जोशीवाडी येथील एक गरोदर महिला तीव्र वेदना होत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र, निर्माण प्लाझा परिसरात प्रसूती कळा वाढल्या, ती रस्त्याच्या कडेला बसली. हा प्रकार पाहताच परिसरातील महिलांनी लगेच धाव घेत स्कार्फ, शेजारच्या घरातून साडय़ा आणून आडोसा निर्माण केला. काही क्षणांतच तिने रस्त्यावरच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. मात्र, अशा पद्धतीने लाडक्या बहिणीची रस्त्यात प्रसूती झाल्याने सरकारी आरोग्य व्यवस्थेविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येता नागरिकांनी तत्काळ नगरसेविका डॉ. सुनीता पोटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्या महिलेची परिस्थिती पाहता, त्यांनी तातडीने प्रसूती करणं गरजेचे असल्याचे सांगितले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, डॉ. पोटे यांचे कौतुक होत आहे. प्रसूतीनंतर डॉक्टरांनी गोंडस बाळाला उंचावून दाखवताच नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

गरोदर महिला पतीसह दुचाकीवरून शिरूर ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र, निर्माण प्लाझा येथे प्रसूती कळा सुरू झाल्याने ती रस्त्याच्या कडेला बसली. पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी डॉ. संतोष पोटे यांना याबाबत माहिती दिली. डॉ. सुनीता पोटे, पूजा पोटावळे, स्मिता पाटील, प्रियांका गोरे, वृषाली बोरकर, सुवर्णा चिपाडे, तनुजा अवचिते घटनास्थळी पोहोचल्या.

बाळ आणि आईची प्रकृती स्थिर आहे. संकटाच्या काळात सगळे मदतीला धावून येतात, हीच खरी माणुसकी असल्याचे डॉ. सुनीता पोटे यांनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसंदर्भात आज कुणीही आले नाही. कोणालाही नगरला व पुण्याला जाण्याचा सल्ला दिला नाही. याबाबत आमच्या रुग्णालयात कुठलीही नोंद नाही. – तुषार पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय

आम्ही शिरूर ग्रामीण रुग्णालयात गेलो होतो. परंतु तेथे डिलिव्हरी संबंधातील कागदपत्रे नसल्याने आम्हाला दवाखान्यात दाखल करून घेतले नाही. पुणे किंवा नगरला जा असे सांगितले. रुग्णालय प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे. – सुप्रिया काळे (बाळाची आई)

Comments are closed.