एफबीआयच्या तपासानंतर पंजाब पोलिसांची कारवाई

एनआरआय परिवाराकडून लाच मागणारा अधिकारी अटकेत

वृत्तसंस्था/ होशियारपूर

पंजाबमधील एका हत्येप्रकरणी अमेरिकेत राहत असलेल्या परिवाराकडून लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गुरिंदरजीत सिंह नागरा याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाल्यावर पोलिसांनी अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हे नोंदवत त्याला ताब्यात घेतले आहे.

तर एफबीआयकडून याप्रकरणी खुलासा केल्यावर गुरिंदरजीत सिंह नागराला तत्काळ प्रभावाने पोलीस स्थानक प्रभारी पदावरून हटविण्यात आले होते. तसेच हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी अन्य पोलीस अधिकाऱ्याला संबंधित प्रकरण सोपविण्यात आले होते.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान तांत्रिक पुरावे, आर्थिक व्यवहार, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करण्यात आली. चौकशीत गुरिंदरजीत सिंह नागराने अमेरिकेत राहत असलेल्या एका परिवाराकडून 16 लाख रुपयांची लाच मागत ती रक्कम स्वीकारली होती असे समोर आले. याप्रकरणी त्याला आता अटक करण्यात आली आहे.

आरोपीच्या पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान या प्रकरणात आणखी कोण सामील होते हे जाणून घेतले जाणार आहे. पंजाब पोलिसांनी आरोपी अधिकारीला यापूर्वीच निलंबित केले आहे. तसेच त्याच्या विरोधात विभागीय कारवाई देखील सुरु केली आहे. सेवा नियमांच्या अंतर्गत स्वतंत्र चौकशी केली जाणार असून त्याच्या आधारावर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.

 

 

Comments are closed.