मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न?; फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले

मुंबई : नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्ष आणि महायुतीमधील काही मंत्र्‍यांना लक्ष्य केलं. काही मंत्री भडकाऊ भाषण करतात, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले असून काहींनी नाव घेऊन मंत्री नितेश राणेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर, महाविकास आघाडीतील आमदारांनी नितेश राणे (Nitesh Rane) हेच दोन समाजात तेढ निर्माण करतात असे म्हटले होते. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी नितेश राणेंना बोलावून तंबी दिल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले. आता, लोकमत समुहाच्या कार्यक्रमातील मुलाखतीत याच प्रश्नावर मुख्यमंत्र्‍यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी, दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखल देत, मंत्री असताना आपण राजधर्म पाळला पाहिजे, आपण संविधानाची शपथ घेऊन काम करतो, ती शपथ पाळली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबतचा प्रश्न विचारला होता. तुमच्या सरकारमधील काही मंत्री दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करतात, तुमची त्यावर भूमिका काय? या प्रश्नावर मुख्यमंत्र्‍यांनी उत्तर देताना नाव न घेता मंत्र्‍यांचे कान टोचले. मला वाटतं आपण मंत्री असतो तेव्हा आपण संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केला होता. मंत्री म्हणून आपण राजधर्म पाळायचा असतो. त्यामुळे, आपले विचार काय आहेत, आपली आवड-नावड काय आहे हे बाजुला ठेऊन आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला, कोणावरही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे, मला असं वाटतं की मंत्र्‍यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होईल, असं बोलू नये. पण, कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात अशावेळी मी त्यांच्याशी संवाद करतो, त्यांना सांगतो की तुम्ही आता मंत्री आहात, संयम ठेऊनच तुम्ही बोललं पाहिजे, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, नागपूरमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले.

मी मुख्यमंत्र्‍यांचा लाडका मंत्री

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर नितेश राणे त्यांच्या नेहमीच्या आवेशात दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का, असा प्रश्न विचारल्यानंतर नितेश राणे यांचा पारा काहीसा चढला. मी माझ्या मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुख्यमंत्री माझा हात हातात घेऊन हसले. तुम्ही तुमच्या बातम्या चालवा. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

हेही वाचा

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..

Comments are closed.