NZvsIND: मालिकेआधीच संघाला मोठा झटका! शूटींगदरम्यान खेळाडूचा खांदा निखळला

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. संघ सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या तयारी करत आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध एकमेव टी20 सामना खेळणार आहे. त्यानंतर भारत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकांनंतर भारताचा न्यूझीलंड दौरा आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नसताना न्यूझीलंड अडचणीत आला आहे.
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू रचिन रवींद्र दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याला खांद्याची गंभीर दुखापत झाली असून त्याच्या भारताविरुद्ध खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.
भारत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यामध्ये 5-5 सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळण्याचे नियोजन आहे. या दौऱ्याची सुरूवात 22 ऑक्टोबर रोजी टी20 सामन्याने होणार आहे.
या मालिकेसाठी एक महिना शिल्लक असताना एका प्रमोशनल शूटदरम्यान रवींद्र जखमी झाला. न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे हे शूट सुरू होते. तो ड्राईव्हिंग कॅच घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा खांदा निखळला. त्याची ही दुखापत इतकी गंभीर आहे की तो भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण एका महिन्यात पूर्णपणे फिट होणे अशक्य आहे.
रवींद्रला दुखापत झाली असता त्वरित तपासणी केली गेली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही, मात्र रवींद्रचा समावेश होण्याची शक्यता कमीच आहे.
रवींद्र न्यूझीलंडचा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत 24 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 1865 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 39 एकदिवसीय सामन्यांमझ्ये 1424 आणि 52 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 759 धावा केल्या आहेत.
रवींद्रने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकाच्या सहाय्याने 309 धावा, चार एकदिवसीय सामन्यांमध्ये 131 धावा आणि सात टी20 सामन्यांमध्ये 89 धावा केल्या आहेत. (Rachin Ravindra has dislocated his right shoulder during promotional shoot Setback For New Zealand ahead of IND vs NZ Series)
Comments are closed.