खुद्द राहुल गांधी यांनीच विरोधकांच्या ऐक्याला धोका निर्माण केला आहे.

द्रमुककडून काँग्रेस नेत्यावर उपरोधिक टिप्पणी

वृत्तसंस्था, चेन्नई

इंडी आघाडीपासून अंतर राखल्यावर तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. एकतेबद्दल बोलणारे राहुल गांधी स्वत:च एकता मोडीत काढण्यासाठी जबाबदार आहेत. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘इंडी’ आघाडीच्या घटक पक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी सर्वप्रकारचे अनैतिक मार्ग अवलंबिणे काँग्रेससाठी लाजिरवाणे नाही का असा प्रश्न द्रमुकने स्वत:च्या मुखपत्राद्वारे उपस्थित केला आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आणि हे सर्वकाही पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधींच्या कृपेमुळेच घडले आहे. प्रत्येक राज्यात विरोधी पक्षांच्या एकतेला नुकसान पोहोचणारे राहुल गांधी हेच नाहीत का असा सवाल द्रमुकने उपस्थित केला आहे.

राहुल गांधींनी इंडी आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत केलेले स्वत:चे भाषण जारी केले आहे, कारण काँग्रेसच्या विरोधात इंडी आघाडीच्या घटक पक्षांकडून करण्यात आलेले आरोप सार्वजनिक चर्चेत व्यापक स्वरुपात फैलावले होते. डावे पक्ष, समाजवादी पक्ष आणि राजदने राहुल गांधींवर कठोर टीका करत त्यांच्या भूमिकेमुळेच विरोधी एकता कशाप्रकारे कमकुवत झाली हे अधोरेखित केले होते असा दावा मुरासोली या द्रमुकच्या मुखपत्रात करण्यात आला आहे.

केरळमध्ये काँग्रेस आणि माकप दोन्ही प्रभावशाली राजकीय पक्ष आहेत, एप्रिलमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधात राजकीय संघर्ष केला होता, याकरता कुणीच त्यांना दोषी ठरविले नाही, परंतु राहुल गांधींकडून करण्यात आलेले आरोप बालिशपणाचे होते. राहुल गांधी यांनी  केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना अटक करण्याची मागणी केली होती. यामुळे डावे नेते आजही त्यांच्यावर नाराज आहेत, काँग्रेसचा संघर्ष भाजपसोबत आहे का स्वत:च्याच सहकाऱ्यांसोबत, अशी विचारणा होत असल्याचा दावा असे मुरासोली मुखपत्रात करण्यात आला आहे.

संकटसमयी आम्ही दिली साथ

काँग्रेस जेव्हा स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडत होता, तेव्हा आम्ही त्या पक्षाला सावरण्यास मदत केली. परंतु काँग्रेसला एक नवी आणि चमकदार खेळणी (नवा साथीदार) दिसताच त्यांनी त्वरित तंबू बदलल्याची टीका द्रमुकने केली आहे.

Comments are closed.