राहुल गांधींनी ते खाली खेचले.

गर्भवती महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील एक प्रसंग चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात पोहचल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या जवळ उभ्या असणाऱ्या एका महिला पत्रकाराचा हात धरुन ओढले आणि नंतर तिच्यासह आलेल्या व्हिडीओग्राफरलाही ढकलले. त्यामुळे तो या महिला पत्रकाराच्या अंगावर पडला आणि ही महिला पत्रकार खाली पडली. ती तीन महिन्यांची गर्भवती आहे, असा आरोप तिने केला आहे. काँग्रेसकडून या आरोपाचा इन्कार करण्यात आला.

इंडिया वन या वृत्तवाहिनीची ही पत्रकार असून तिचे नाव रिचा पराशर असे आहे. मंगळवारी काही वृत्तसंस्थांना मुलाखत देताना तिने तिच्यावर ओढवलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांपाशी थांबले तेव्हा मी त्यांच्या जवळच उभी होते. मी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानी माझा हात धरुन मला ओढले. मला मोठाच धक्का बसला. मला सोडा अशी मी त्यांना विनंती केली. हा प्रसंग माझ्या व्हिडीओग्राफरकडून चित्रित केला जात आहे, हे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी व्हिडीओग्राफरला कोपराने धक्का मारला. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो माझ्या अंगावर पडला. याचवेळी गांधी यांच्या सुरक्षा सैनिकांनी आम्हाला ढकलले. आम्ही दोघेही त्यामुळे पायऱ्यांवर पडलो. या गोंधळात अनेक लोक खाली पडले. मला या प्रसंगामुळे मोठाच धक्का बसला आहे, असे या पत्रकाराने मुलाखतीत स्पष्ट केलेले आहे.

मायक्रोफोन खाली पडला

मी खाली पडल्यानंतर माझ्या हातातील मायक्रोफोन खाली पडला. मी ओरडून मायक्रोफोन खाली पडल्याचे आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि, राहुल गांधी यांच्या आजूबाजूच्या समर्थकांनी माझ्याकडे लक्ष न देता गांधी यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे माझा आवाज दबला गेला. खाली पडल्याने मला रात्री रुग्णालयात जावे लागले, अशी व्यवस्था तिने मांडली.

काँग्रेसकडून इन्कार

काँग्रेसने तिचे सर्व आरोप नाकारले आहेत. गांधी यांनी कोणालाही धक्का दिलेला नाही. ही महिला पत्रकार खोटे आरोप करीत आहे. तिच्या आरोपांना आधार मिळेल असा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. ही महिला प्रसिद्धी मिळविण्यासाठी असा आरोप करीत आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.

राजकीय वादंग

या महिला पत्रकाराच्या आरोपांमुळे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि संरक्षणाचा आव आणतात. पण त्यांची महिलांविरोधातील स्वत:ची वर्तणूक या महिला पत्रकाराच्या आरोपाने जगासमोर आली आहे, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मंगळवारी करण्यात आली आहे.

Comments are closed.