राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या राजुरा मतदारसंघात निकाल काय लागला, कोण जिंकलं, कोण हरलं, किती मत
राहुल गांधी: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ‘राजुरा’ विधानसभा मतदारसंघात (Rajura Assembly Constituency) मतचोरीचे गंभीर आरोप करत पुरावे सादर केले आहेत. त्यांनी दावा केला की, या मतदारसंघात हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली असून 6,850 नवीन नावे भरली गेली आहेत. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजुरा विधानसभा मतदारसंघात कोण जिंकलं, कोण हरलं, मतदारसंख्या किती? याबाबत जाणून घेऊयात..
राजुरा मतदारसंघात काय निकाल लागला?
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघ भाजपने जिंकला. भाजपचे देवराव विठोबा भोंगळे यांनी काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष रामचंद्रराव धोटे यांचा 3,054 मतांनी पराभव करून विजय मिळवला. हा निकाल तुलनात्मकदृष्ट्या कमी मताधिक्याने लागल्याने राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या “मतांमध्ये छेडछाड” आणि “हजारो नावे हटवणे व नव्याने नोंदवणे” या आरोपांकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे.
राजुरा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या व मतदान केंद्रे
नोंदणीकृत मतदार : 3,15,073
पुरुष मतदार : 1,59,821
महिला मतदार : 1,55,252
मतदान केंद्रे : 344
राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भाग असून, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील आणि चुरशीचा मतदारसंघ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली आणि नव्याने 6,850 नावे वाढवण्यात आली. मतांची चोरी केल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत. हाच प्रकार महाराष्ट्रासह कर्नाटक आणि हरियाणामध्ये घडला आहे.” त्यांनी आणखी एक उदाहरण देताना सांगितले की, कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात 6,018 मते हटवली गेली, जेव्हा एका बीएलओने (Booth Level Officer) आपल्याचा काकांचे नाव वगळल्याचे लक्षात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राजुरा विधानसभा निकाल
2024 = देवराव भोंगले (भाजप) विजयी एकूण मते = 72,882 वि. सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत = एकूण मते – 69,828
2019 = सुभाष धोटे (काँग्रेस) विजयी एकूण मते =. 60,228 वि. वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) = एकूण मते – 57,727
2014 = संजय धोटे (भाजप) विजयी एकूण मते =. 66,223 वि. सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत = एकूण मते – 63,945
सुभाष धोटे यांचा गंभीर आरोप
दरम्यान, राजुरा मतदार संघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले होते की, राजुरा मतदार संघात निवडणुकीपूर्वी मी बोगस मतदार नोंदणी झाल्याची जिल्हाधिकारी आणि एसडीएम यांच्याकडे तक्रार केली होती. माझ्या तक्रारीनुसार त्यांनी 6853 मत कमी देखील केली. त्यानंतर देखील दहा-बारा हजार मतं अशी होती मात्र आमचं निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे लक्ष गेलं नाही, मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही सतर्क झालो आणि आम्ही देखील गावागावात अशी चौकशी केली, तेव्हा आम्हाला गडचांदूर आणि राजुरामध्ये जास्तीचे मतदार आढळले. त्याची आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, जी 6853 नाव बोगस आढळली, ती ज्यांनी एनरोल (enroll) केली त्यांच्यावर निवडणूक आयोगाने अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही. आम्ही निवडणूक आयोगासोबत वारंवार पत्रव्यवहार करतोय मात्र काही झालेलं नाही, असे त्यांनी म्हटले होते.
कोण आहेत भाजपचे देवराव भोंगळे?
देवराव भोंगळे हे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. देवराव भोंगळे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष धोटे यांच्यासोबत झाली होती. देवराव भोंगळे यांच्या रूपाने भाजपने या मतदारसंघात एक तरुण आणि नवीन चेहरा दिला होता. या निवडणुकीत देवराम भोंगळे हे विजयी झाले.
https://www.youtube.com/watch?v=UPFCXSLW91Y
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.