राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे 'इंडिया' युतीमध्ये फूट पडली आहे.
पिनाराई विजयन यांची गळाभेट घेणार नसल्याची भूमिका : आघाडीतील घटक पक्ष माकप संतप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’मधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील तणाव वाढला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांध्मी यांनी त्यांच्या सहकारी पक्षांकडूनच टीकेला तोंड द्यावे लागत आहे. वादाचे कारण केरळचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे वरिष्ठ नेते पिनाराई विजयन यांची गळाभेट घेण्यास राहुल गांधींनी दिलेला नकार ठरले आहे.
8 जून रोजी इंडी आघाडीच्या बैठकीतील राहुल गांधींचा एक ऑडिओ समोर आला असून यात राहुल हे आपण विजयन यांची गळाभेट घेणार नाही, कारण आमचा त्यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू आहे असे म्हणत असल्याचे ऐकू येते. आमच्यादरम्यान मतभेद आहेत, परंतु जर तुम्ही मला केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची गळाभेट घेण्यास सांगणार असाल तर मी असे करणार नाही असे राहुल यांनी म्हटले होते.
काँग्रेस अन् माकप प्रतिस्पर्धी
केरळमध्ये काँग्रेस आणि माकप दीर्घकाळापासून परस्परांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. अलिकडेच काँग्रेसने पिनाराई विजयन यांच्या सरकारला सत्तेबाहेर केले होते. परंतु राष्ट्रीय स्तरावर दोन्ही पक्ष इंडी आघाडीचा हिस्सा आहेत आणि भाजपच्या विरोधात मिळून राजकारण करत आहेत.
राजकीय संदेशाची चिंता
राहुल गांधी आणि माझ्यादरम्यान गळाभेटीची परंपरा कधीच राहिली नाही. सर्वसाधारणपणे दोन्ही नेते औपचारिक अभिवादन किंवा हस्तांदोलनापर्यंतच मर्यादित राहतात. गळाभेटीवरून माझा विरोध नाही, परंतु राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे जो राजकीय संदेश जातो त्याबद्दल मला चिंता आहे. हा त्यांचा राजकीय दृष्टीकोन आणि इंडी आघाडीवरून त्यांची मानसिकता दर्शवित असल्याची भूमिका पिनाराई विजयन यांनी मांडली आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींनी संसदेत घेतलेली गळाभेट इंटरनेटवर अत्यंत चर्चेत राहिली होती अशी आठवण विजयन यांनी यावेळी करून दिली.
डाव्या नेत्यांकडून टीकेची झोड
राहुल गांधी यांना कुणीच पिनाराई विजयन यांची गळाभेट घेण्यास सांगितले नव्हते. परंतु राहुल गांधी यांनी विजयन यांच्या अटकेची मागणी करणे बंद करावे असे माकपचे महासचिव आणि माजी खासदार एम.ए. बेबी यांनी सुनावले आहे. हा मुद्दा गळाभेटीचा नव्हे तर इंडी आघाडीचे राजकारण अन् त्याच्या विश्वसनीयतेचे असल्याचा दावा माकप खासदार जॉन ब्रिटास यांनी केला आहे.
कोट्स
आम्हाला कुणाच्या गळाभेटीची आवश्यकता नाही, कम्युनिस्टांना आलिंगन देण्याचे राजकारण नको असून आम्हाला स्पष्ट राजकीय विचार हवा आहे. राहुल गांधींनी स्वत:च्या गळाभेटीचे राजकारण स्वत:कडेच ठेवावे, परंतु विरोधी पक्षनेता म्हणून पिनाराई विजयन यांच्या सारख्या नेत्यांचा सन्मान अवश्य करावा.
वृंदा करात, माकप नेत्या भाजपने साधला निशाणा
या पूर्ण वादावर भाजपने काँग्रेस अन् इंडी आघाडीवर शाब्दिक हल्ला चढविला. इंडी आघाडी केवळ सोयीसाठी एकत्र आलेले लोक आहेत. प्रत्यक्षात इंडी आघाडी केवळ विभाजन आहे, ही आघाडी केवळ कागदावर आहे. छायाचित्रे काढून घेण्यासाठी लोक एकत्र येऊ शकतात, परंतु त्यांची मने कधीच जुळू शकत नाहीत अशी टीका भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.
डावे पक्ष हताश
डावे पक्ष राजकीय हीनभावनेचे शिकार ठरले आहेत आणि स्वत:च्या निवडणूक पराभवाची समीक्षा करण्याऐवजी राहुल गांधींना लक्ष्य करत आहेत. काँग्रेस आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या समर्थनाने राजकीय अस्तित्व कायम राखणारा माकप आता राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वत:ची हताश दाखवत आहे. माकपने राहुल गांधींवर केलेली टिप्पणी पूर्णपणे हास्यास्पद आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी यापूर्वी राहुल गांधींच्या प्रतिमेचा राजकीय लाभ उचलला आहे, परंतु आता ते राहुल गांधी यांना ‘ईडीचा एजंट’ ठरवून त्यांची प्रतिमा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.
Comments are closed.