Video:पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निकाल; फौजदारीचे आदेश
मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्या समर्थकांमधील वादावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली आहे. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा अशा सूचनाही केल्या आहेत. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले (वय 37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (वय 41) यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध चौकशी करुन विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे, असेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.
17 जुलै 2025 रोजी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु असताना काही सन्माननीय सदस्यांनी माझ्या निदर्शनास आणले आहे की, विधानभवन इमारतीच्या प्रवेशद्वारावार मेन पोर्च येथे दोन अभ्यागतांमध्ये मारामारी झाली आहे. याबाबत विविध प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. विधानमंडळाचे सदस्य यांच्याबाबत टीकाटिप्पणी करण्यात आली आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून सभागृहाच्या प्रसिमेमध्ये घडली आहे. याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालातून दिसून येते की, 17 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मेन पोर्चमध्ये अचानक दोन अभ्यागतांमध्ये मारामारी सुरु झाली. ही मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली. नमूद इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यापैकी नितीन हिंदुराव देशमुख ( वय 41) याने जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तर दुसरा इसम सर्जेराव बबन टकले (वय 37) याने गोपीचंद पडळकरांचा यांचा मावसभाऊ असल्याचे सांगितले.
याबाबत संबंधितांविरोधात आणि त्यांच्यासोबतच्या सहा ते सात जणांविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे हे अभ्यागत विधानभवनाच्या आवारात आले. त्यांनी मारामारी करुन आक्षेपार्ह कृत्य केल्याच दिसून येते. विधानमंडळाच्या प्रसिमेममध्ये अशी घटना यापूर्वी कधीही झालेली नाही. सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची कोणतीही आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. तसेच अभ्यांगत कोणत्याही कारणामुळे विधानभवनात आले तर त्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित सदस्याने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणत आहे की, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्त्व आणि जबाबदारी आहे. विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. त्यामुळे, दोन्ही सदस्यांनी सभागृहात खेद व्यक्त कराव्या, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या होत्या. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना सभागृहात आणल्याबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा, तसेच, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दखल घ्यावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=b9i9o_izyem
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद बाळगत करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
माझा काहीही संबंध नाही – आव्हाड
नितीन देशमुखला पास देण्यासाठी मी कुठलीही शिफारस केली नाही, मी त्याला विधिमंडळात आणलं नाही. मी माझ्या पीए शिवाय कधीच कुणाला सभागृहात आणत नाही. विशेष म्हणजे जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मी विधिमंडळ परिसरात देखील नव्हतो. याउलट मी मरीन ड्राईव्ह परिसरात होतो. त्यामुळे, या घटनेशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले.
हे आमदार माजले आहेत, मुख्यमंत्रीच संतापले
दरम्यान, आमदार पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून होत असलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना कुठेतरी आपण राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ही प्रतिष्ठा एका व्यक्तीची नसून सगळ्या आमदारांची प्रतिष्ठा बाहेर पडली आहे. शिव्या दिल्या जात आहेत, हे सगळे आमदार माजले म्हणून बाहेर बोललं जात आहे, असे म्हणत कुणाचंही इथं समर्थन करणं योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
हेही वाचा
धक्कादायक! विधिमंडळात जाण्यासाठीचे पास 5 ते 10 हजारांना विकले जातात; आमदारांनी सांगितलं कुठं भेटतात?
आणखी वाचा
Comments are closed.