दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोलावर ईडीची कारवाई, मुंबई आणि गुजरातमध्ये 20 ठिकाणी छापेमारी
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोला याच्या नेटवर्कवर ईडीची सुरू आहे. सलीम डोला याच्याशी संबंधित मुंबई आणि गुजरातमध्ये 20 ठिकाणी छापे टाकले. मनी लाँड्रिंग आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणात ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या पथकांनी मुंबई, सुरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह 20 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
सलीम इस्माईल डोला आणि त्याच्या साथीदारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटविरोधात ही कारवाई सुरू आहे. अनेक देशांमध्ये हे नेटवर्क पसरलेले असून हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी सुरू आहे. अलीकडेच, हिंदुस्थान सरकारने सलीम डोलाला तुर्कीमधून देशात प्रत्यार्पित केले.
सलीम डोला हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय मानला जातो. सलीम डोला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवत होता, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना ईडीकडून लक्ष्य करण्यात येत आहे. याशिवाय, अमली पदार्थाचे उत्पादक आणि वितरक यांच्यासह हवाला चालक आणि बेनामी मालमत्तांच्या मालकांचाही तपासात समावेश करण्यात आला आहे.
सलीम डोला आणि इतर आरोपींविरुद्ध मुंबईत दाखल झालेल्या अनेक एफआयआरच्या आधारे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत हा मनी लाँडरिंग तपास सुरू करण्यात आला आहे.
तपासादरम्यान ईडीला संघटित आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटचे पुरावे सापडले आहेत. तसेच आपली खरी ओळख लपवण्यासाठी गुन्ह्यातून मिळालेला पैसा हवाला मार्गांनी हस्तांतरित केला जात होता. या पैशांचा वापर विविध व्यक्ती आणि साथीदारांच्या नावावर जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला गेला. अनेक गुंतवणूक अनामिक नावांवर करण्यात आल्याचेही संकेत आहेत, असे तपासात उघड झाले आहे.
ईडीचे पथक संपूर्ण नेटवर्कच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. लेखापाल, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि इतर आर्थिक सल्लागारांच्या भूमिकेचीही तपासणी केली जात आहे. हवाला मार्गाने हस्तांतरित केलेल्या पैशांचा वापर हिंदुस्थान आणि परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी कसा केला गेला? याचाही तपास ईडी करत आहे. छापेमारीत कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि इतर डिजिटल पुरावे गोळा केले जात आहेत.
Comments are closed.