दीड हजार रायगडकरांना भटक्या कुत्र्यांचे चावे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगड जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अवघ्या आठ महिन्यांत १ हजार ५४५ जणांचे चावे गुरुत्र्यांनी घेतले आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असून घराबाहेर पडायलाही ते घाबरत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासन नेमके कधी जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

शहरांसह ग्रामीण भागांतही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गल्लीबोळ, बाजारपेठा, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावर अन्न फेकल्याने सुळसुळाट

शहर तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा आणि रस्त्यांवर फेकलेले मांसाहारी अन्नपदार्थ यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येते. एसटी स्थानक, बाजारपेठा आणि रहिवासी परिसरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने कुत्रे त्या ठिकाणी जमा होतात. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने केले तर भटक्या कुत्र्यांचे फावणार नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

आठ महिन्यांत १,५४५ नागरिकांचे लचके भटक्या कुत्र्यांनी घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोकाही कायम आहे.

फक्त आठ महिन्यांत दीड हजार नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करूनही जिल्ह्याचा आरोग्य विभाग अजूनही अलर्ट मोडवर आलेला नाही. या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Comments are closed.