रोहा शहरावर काही जणांकडून अतिक्रमण, आम्हीही आरेला कारे उत्तर देऊ; अनिकेत तटकरेंचा महेंद्र दळवीं


रायगड बातम्या: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमनेसामने आल्याचे दिसून येत आहे. रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना नाव न घेता इशारा दिला आहे.

महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक कार्यकर्त्यांनी अलीकडेच शिंदे सेनेत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर तटकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनिकेत तटकरे यांनी जोरदार भाषण करत शिवसेनेवर थेट निशाणा साधला.

Raigad News: आरेला कारे उत्तर देऊ : अनिकेत तटकरे

बैठकीदरम्यान बोलताना अनिकेत तटकरे म्हणाले, “रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे यांना आव्हान देण्याचे काम काही जण करत आहेत. पण अशी आव्हाने परतवून लावण्याची ताकद आमच्यात आहे. आरेला कारे उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा आहे,” असे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “कालची पोरं, ज्यांना वयाचा इतिहास-भूगोल माहीत नाही, तीही आज येऊन बोलतायत. सुनील तटकरे यांना कोणीही येऊन टपली मारून जाईल आणि आम्ही शांत बसू, असं होणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिलाय.

Raigad News: राजकारणात वाढती चुरस

दरम्यान, महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेत झालेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाल सुरू झाली आहे. रोहा हा तटकरे कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिंदे सेनेच्या वाढत्या हालचालींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून संघटनात्मक बळकटपणावर भर दिला जात आहे. स्थानिक पातळीवर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील ही चुरस आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्…रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब, फेसबुक पोस्ट करत सगळं काढलं!

Sangli News: जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदललं; काही दिवसांपूर्वी धुराडा पेटू देणार नाही असा पडळकरांनी जयंत पाटलांना दिलेला इशारा

आणखी वाचा

Comments are closed.