पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली; चित्रलेखा पाटलांना दिला धक्का
रायगड : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात सर्वसामान्यांचे हाल झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच, मुरूड (Raigad) तालक्यातील मिठेखार येथे दरड कोसळल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि शेकापच्या आमदार कुटुंबातील महिला नेत्या भिडल्याने, कार्यकर्त्यांचीही हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलं.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मिठेखार गावात कोसळलेल्या दरड प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या राजकीय नेत्यांच्या चढाओढीत दोन राजकीय महिलांची खडाजंगी झाली. शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात हा वाद झाला. पन्नास खोके सरकार करतोय काय सत्ता तुमच्याकडे असताना हे सरकार करतंय काय? आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही, अशा स्वरुपात चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला. यावेळी, त्यांच्या पाठिमागेच उभ्या असलेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी चिडल्या आणि त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांना पाठीमागून धक्का दिला. त्यानंतर, या दोन्ही महिला नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दित जुंपली होती, त्यानंतर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली असून हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड करुन गुवाहटी गाठल्यानंतर त्यांच्यावर गद्दार आणि 50 खोक्के एकदम ओक्के अशी टीका करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने चित्रलेखा पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता 50 खोके म्हटल्याने आमदार महेंद्र थोरवेंच्या पत्नी चिडल्याचं पाहायला मिळालंय
सावित्री, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. रोहा तहसीलदार व नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून फक्त अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महाडमधील सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून, सध्या पाणी पातळी 6.30 मीटरवर पोहोचली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाडमधील भोई घाट आणि मच्छी मार्केट परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.