अकवान चक्रीवादळामुळे चार राज्यांत पाऊस

उत्तर प्रदेशात दाट धुके : माऊंट अबूमध्ये तापमान शून्य अंश सेल्सिअस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अकवान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. आता या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असतानाच देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडी आणि धुक्याचा प्रभाव वाढत आहे. उत्तर प्रदेशातील 12 जिह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रयागराज आणि गोरखपूरसह अनेक शहरांना दाट धुक्याने वेढले आहे. राजस्थानमध्येही थंडी वाढत आहे. शनिवारी माऊंट अबूमध्ये तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने थंडी वाढली आहे. सीकरमध्ये किमान तापमान 6.5 अंश सेल्सिअस आणि जयपूरमध्ये 13.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तथापि, दिवसभर उष्णता कायम होती. बारमेरमध्ये कमाल तापमान 33.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

अकवान चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आता थंडीची चाहूल तीव्र झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली आहे. शुक्रवारी रात्री शाजापूरमध्ये 7.1 अंश सेल्सिअस या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. भोपाळमध्ये 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

उत्तर प्रदेशातील 12 जिह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लखनौ आणि आसपासच्या जिह्यांमध्ये हलके धुके कायम आहे. गेल्या 24 तासांत मुझफ्फरनगर हे उत्तर प्रदेशातील सर्वात थंड ठिकाण ठरले असून तेथे 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राजस्थानात थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढला आहे. राज्यात 10 हून अधिक शहरांमध्ये तापमान एकेरी अंकात म्हणजेच 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. फतेहपूर (सीकर) येथे 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. तथापि, डोंगराळ जिह्यांच्या खोऱ्यांमधील काही भागांमध्ये हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोणत्याही जिह्यासाठी इशारा जारी केलेला नाही. पंजाब आणि चंदीगडमध्ये दोन दिवस दाट धुक्याची शक्यता आहे. यानंतर, 26 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. हरियाणामध्ये थंडी वाढली आहे. राज्यातील 18 जिह्यांमध्ये दाट धुक्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत असेच हवामान कायम राहील. दरम्यान, राज्यातील 9 जिह्यांमध्ये रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. गुरुग्राममध्ये 7.3 अंश सेल्सिअस तापमानासह राज्यात सर्वाधिक थंडी होती.

Comments are closed.