लक्ष्य, सात्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात आले

वृत्तसंस्था, कोव्लून

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या हाँगकाँग खुल्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचे एकेरीतील तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

पुरुष दुहेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाची आठवी मानांकित जोडी मेन वेई चाँग आणि ती केई वुन यांनी भारताच्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचा 21-18, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीमध्ये मलेशियाच्या जोडीने वेगवान खेळावर आणि अचूक स्मॅश फटक्यावर अधिक भर देत साईराज आणि चिराग यांची सर्व्हिस वारंवार भेदली. हा सामना अटीतटीचा झाला. सात्विक आणि चिराग या जोडीने चालू वर्षाच्या बॅडमिंटन हंगामात सिंगापूर आणि चीनमधील स्पर्धा जिंकल्या आहेत.

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान 21-13, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. हा उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी झाला. लक्ष्य सेनने चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात हायलो खुली तसेच कुमामोटो मास्टर्स जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. लक्ष्य सेन तसेच सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील एकूण आव्हान संपुष्टात आले आहे.

Comments are closed.