‘पीएम केअर्स’मधून मदत आणा; पण दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या, आदित्य ठाकरे यांची सरकारकडे जोरदार मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘महाराष्ट्रात जवळपास80 टक्के भागात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, दुष्काळग्रस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचते आहे का? एरवी एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारा दुष्काळ यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आहे. पुण्यातही एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाची वेळ येण्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे. गुजरातला मदत केली, तशी महाराष्ट्रालाही करा. गरज पडल्यास पीएम केअर्स फंडातून पैसे आणा आणि दुष्काळग्रस्तांना मदत द्या,’ अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंढवा येथे शाखा उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या मदतीवरून सवाल उपस्थित केले. आदित्य ठाकरे म्हणाले, दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या काळात सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अनेकांना दिवाळीपूर्वी मिळाली नव्हती. त्यामुळे आता दुष्काळग्रस्तांना जाहीर होणारी मदत प्रत्यक्षात त्यांच्या हातात पोहोचणार का, हा प्रश्न आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर मदत वेळेत मिळाली पाहिजे. राज्यातील पाणी नियोजनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा सुरू आहे. औद्योगिक क्षेत्राला पाणी देताना शेती आणि शेतकऱयांच्या गरजांकडे दुर्लक्ष होता कामा नये. एमआयडीसी, उद्योग आणि शेती यांच्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. वाढते शहरीकरण, बांधकामे आणि काँक्रिटीकरण यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि जमिनीतील पाणीपातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकारी दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन पडवळ, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, शहरप्रमुख वसंत मोरे, महापालिकेतील गटनेते नितीन गावडे, विजय देशमुख, महादेव बाबर, उपशहरप्रमुख समीर तुपे आदी उपस्थित होते.

पुण्यात भाजपच्या कंत्राटदार मित्रांचा आवाज

पुण्यात पुणेकरांचा आवाज कमी आणि भाजपच्या कंत्राटदार मित्रांचाच आवाज जास्त आहे. गेल्या दशकभरापासून भाजपकडून इथे नियोजनशून्य विकास सुरू आहे. नदीपात्रात राडारोडा टाकून काँक्रिटीकरण केले जात आहे, नदी अरुंद केली जात आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास या प्रकल्पांमुळेच ती निर्माण होईल. अवघ्या पंधरा मिनिटांच्या पावसाने पुणे तुंबत असून, हा विकास नसून विनाशाकडे वाटचाल आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.