आता कोंबड्यांना स्वदेशी बर्ड फ्लू लस

किंमत केवळ 1 ते 2 रुपये : विषाणूपासून 6 महिन्यांचे संरक्षण

वृत्तसंस्था/ भोपाळ

बर्ड फ्लूमुळे बऱ्याचदा अनेक कोंबड्यांचा मृत्यू होतो. शास्त्रज्ञांनी आता भारतातील पहिली स्वदेशी लस विकसित केली असून कोंबड्यांना एच5एन1 विषाणूशी लढण्यास मदत करणार आहे. या स्वदेशी लसीचा शुभारंभ भोपाळमध्ये करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी भोपाळमध्ये या लसीचा शुभारंभ केला. यामुळे कोंबड्यांना 6 महिन्यांपर्यंत संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.

भोपाळ येथील ‘आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय-सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस’मधील शास्त्रज्ञांनी एच5एन1 विषाणूशी लढण्यास सक्षम असलेली एक यशस्वी बर्ड फ्लू लस विकसित केली आहे. याची किंमत प्रतिडोस फक्त 1 ते 2 रुपये असण्याचा अंदाज आहे. शिवाय, ही लस कोंबड्यांना 6 महिन्यांपर्यंत संरक्षण देईल अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

लस लवकरच बाजारात आणण्याचे निर्देश

लसीच्या शुभारंभावेळी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ती लवकरच बाजारात आणण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमादरम्यान लस विकास पथकातील आठ शास्त्रज्ञांचाही सत्कार करण्यात आला. या लसीवर सप्टेंबर 2025 मध्ये काम सुरू झाले. भोपाळ येथील आयसीएआर-निहसादमध्ये संचालक डॉ. अनिकेत सन्याल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्रज्ञ डॉ. एस. नागराजन यांच्या नेतृत्वाखाली आठ शास्त्रज्ञांच्या पथकाने ही लस विकसित केली आहे.

Comments are closed.