कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला; ठाकरे बंधूंची पिक्चरच्या हिरोलाही लाजवेल अशी एन्ट्री
राज ठाकरे उधव ठाकरे: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी फँटसी असलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची परीकल्पना शनिवारी सत्यात उतरली. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळाला त्याची प्रचंड उत्सुकता होती. मनसे- ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि सामान्य मराठी मतदारांमध्येही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल जोरदार चर्चा होती. यासाठी वरळी डोममध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. ठाकरे बंधूंची एन्ट्री चर्चा होती त्याप्रमाणेच खास अशी ठरली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वरळी डोममध्ये आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्र गीत वाजवण्यात आले. या माध्यमातून राज आणि उद्धव यांनी आपल्यासाठी मराठी भाषा आणि महाराष्ट्र हाच प्राधान्य असल्याचा स्पष्ट आणि ठोस संदेश दिला. यानंतर सभागृहातील सगळ्या लाईट गेल्या आणि काळोख झाला. त्यावेळी सर्वांनी मोबाईल टॉर्च लावल्या. यानंतर व्यासपीठावर प्रकाशाचे दोन झोत सोडण्यात आले आणि दोन्ही दिशांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चालत व्यासपीठाच्या मध्यभागी आले. यावेळी ‘कोण आला रे आला, महाराष्ट्राचा वाघ आला…’ हे गाणे वाजवले जात होते. राज ठाकरे यांच्या जवळ आल्यानंतर उद्धव यांनी त्यांना आलिंगन दिले आणि दोघांनीही कार्यकर्त्यांकडे पाहून हात उंचावून अभिवादन केले. या दोघांच्या गळाभेटीनंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर स्थानापन्न झाले. या दोघांच्या मागे महाराष्ट्राचा नकाशा लावला होता. या माध्यमातून ठाकरे बंधू हेच महाराष्ट्र आणि मराठीचे कैवारी असल्याचा अप्रत्यक्ष संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करुन केली. राज ठाकरे यांनी ‘सन्माननीय उद्धव ठाकरे’, अशी सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सन्माननीय राज ठाकरे’, असे शब्द उच्चारताच सभागृहात ठाकरे समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
https://www.youtube.com/watch?v=hkapoftg4r0
आणखी वाचा
आम्हाला एकत्रं आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा थेट वार
आणखी वाचा
Comments are closed.