कर्जमाफी ते शहरांचं बकालपण गुढीपाडवा मेळ्याव्यातील राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेची 20 वर्ष, अमेरिका इस्त्रायल आणि इराण युद्ध, गॅस संकट, शेतीचा प्रश्न, राज्यातील कायदा व सुव्यवस्था यासह इतर मुद्यांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी मनसैनिकांनी इन्स्टाग्राममधून बाहेर येण्याचं आवाहन देखील केलं. राज ठाकरे म्हणाले की, 9 मार्च 2006 ला पक्ष स्थापन झाला आणि 19 मार्च 2006 ला पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावर झाली. आज 20 वर्ष झाली पक्षाला आणि आनंदाची नि भाग्याची गोष्ट अशी की 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढी पाडवा यावा, मी याला शुभ संकेत पकडतो. निवडणुका आल्या गेल्या झालं, शिमगे झालं, सगळं झालं, आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्रात उभे आहोत. मी जे तुम्हाला बोलतोय ते तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेची सत्ता येणार

मी जे तुम्हाला बोलतोय ते टाळ्यांसाठी बोलत नाहीये, मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून  आपल्याला जी सत्ता घ्यायचीय ती सत्ता भविष्यात हातात घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्या घेण्यासाठी म्हणून नाही, तो माझा आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रात पुढचे तीन वर्ष काही निवडणुका नाहीत, त्यामुळं कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

इराणला साथ द्यायला हवी होती

आज देशातही धाकधूक सुरु आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीये,नेहमी नॉर्मलला असणारी लोकं सध्या गॅसवर आहेत. खरंतर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती, असं राज ठाकरेंनी म्हटलं. या देशामध्ये येणारं सगळं बरेचसं तेल इराणमधून येतं ते आपल्याला रुपयात देत आले, पुढचं मला माहिती नाही. खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठंच निषेधाचं स्टेटमेंट काढलं नाही, हल्ल्यावर कुठलं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही याचा त्रास भविष्य काळात आपल्याला होणार आहे, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

देश कुठं चाललाय, राज्य कुठं चाललीत

आज सगळ्या बाजूने समजत नाही, नेमके कुठे चाललो आहोत काय चाललो आहोत. या देशामधील राज्य कुठं चालली आहेत, लोकं कुठं चालली आहेत, प्रगती कुठं होत आहे. जानेवारीत सभा झाली तेव्हा अनेक लोकांचे वाभाडे काढले, आपण पण किती अडाणी आहेत ते सांगितलं. मी जे तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवत जा, विसरत जाऊ नका. आज फुरसतीत आला आहात ना, फुरसतीत आहात ना जरा असं राज ठाकरे म्हणाले.

मी ज्यावेळेला राजकारणात आलो, माझं पहिलं भाषण जेव्हा झालं, पहिल्या भाषणानंतर माननीय बाळासाहेबांनी बोलावलं होतं,एक एक वाक्य सांगितली होती त्यांनी, जसा स्क्रू फिट व्हावा, तशी वाक्य आत गेली होती. भाषण जेव्हा करशील तेव्हा लक्षात ठेव, काय बोललो याला महत्त्व नाही, काय दिलंस हे महत्त्वाचं आहे, समोरच्याला काय दिलंस हे लक्षात ठेव असं बाळासाहेबांनी सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले.

करमणुकीच्या गटारगंगेत वाहत जाऊ नका

आज तुम्हाला सगळ्यांना, देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल चालू आहे, पिक्चर येत आहेत, ते हाऊसफूल जात आहेत. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या, इन्स्टाग्राम तुम्हाला त्यात गुंतवतं. डान्सबार बंद झालं, इकडे मोबाईलवर ते सुरु झालं. तुम्हाला आतमध्ये गुंतवून ठेवलं आहे. तुम्हाला करमणुकीत गुंतवून ठेवायचं आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. तुम्ही इतके आतमध्ये अडकून गेले पाहिजेत आणि प्रश्न विचारले नाही पाहिजेत, याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरु नाहीये, जगभरात सुरु आहे. आयपीएलमध्ये अडकावं, चित्रपटात अडकावं, टीव्हीत अडकून राहावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं, मग आपल्याला आजूबाजूला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. पूर्वीच्या काळात लोकं जसे रस्त्यावर येत असतं आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करत आहेत, हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे.  वृत्तवाहिन्यांवर दबाव टाकण्यात येतो. एका विचित्र परिस्थितीत देश अडकला आहे, राज्य अडकलं आहे. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात त्या कायमस्वरुपी नसतात, खालून काठी नाही बसली तर वरुन बसतेच. करमणुकीच्या गटारगंगेत तुम्ही वाहत जाऊ नका, आपल्या आजूबाजूचं काही वाहून गेलेय ते तुम्हाला कळणार देखील नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

राज्यावर 11 लाख कोटींचं कर्ज

आपण मोबाईलमध्ये अडकलोय, महाराष्ट्राची काय परिस्थिती होऊन बसली आहे.  आमचे मुख्यमंत्री सांगतात, विकास करतोय, विकास करतोय, 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर, पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2 लाख कोटी रुपये होतं. 2014 ते 2026 पर्यंत हे कर्ज 11 लाख कोटींवर गेलं आहे. शहरांची अवस्था बघा पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो पण तुम्हाला 10 मिनिटात कुठं जाता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

शहरं कोलमडून पडलेत

ब्रिटिशांच्या काळात हे मैदान उभं राहिलं त्यामुळं हे मैदान आहे. आपण लहान मुलांसाठी बागा तरी तयार करतोय का? बागा पाहिल्यानंतर तिकडं जाऊ वाटतं का? शहरं कोलमडून पडलेली आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या उद्या मी तुम्हाला सांगतो, अशीच परिस्थिती राहिली ना घरातून निघालात तर तिकडे नसाल, आपण सगळं गमावून बसतोय. ग्रामीण भागातील तरुण तरुणी शेतीकडे वळायला तयार नाही. शहरात जायचंय म्हणतात. शहरात आल्यावर शहरातील ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील शहर पाहा, कोणीही येतंय, ना त्याला आकार ना उकार, कोणीही येतंय कुठेही इमारती बांधतेय, काहीही बांधतेय, कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जातात. तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करताय हे त्यांना हवंय, तुम्ही रस्त्यावर येता कामा नये, असेच सडा, असेच मरा, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

तीनवेळा शेतकरी कर्जमाफी, दररोज शेतकरी आत्महत्या

राज्यात तीन वेळा शेतकरी कर्जमाफी झाली, आजपर्यंत तीन वेळा कर्जमाफी झाली. या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे, रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोणाला काही पडललेलं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. कोस्टल रोडची आम्हीच स्तुती करतो, अरे तो तुझी वाट लावायला रस्ता झालाय. तो तुमच्यासाठी झालेला नाही, बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठी रस्ता झालाय. सगळ्या शहरांमधील जमिनी चाललेत. अदानी सारखे उद्योगपती सगळं घेत बसलंय, सरकार न बघता सह्या करतंय, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

महाराष्ट्र म्हणून अस्तित्व गमावून बसतोय

आपण महाराष्ट्र म्हणून आपलं अस्तित्व गमावून बसतोय, आपली भाषा गमावून बसतोय, महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय, मी मागेच सांगितलं होतं, ती एकदा गोष्ट हातातून गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपले आहेत. जग जेव्हा मराठी माणूस म्हणतं म्हणजे तुम्ही कोण आहात. मराठी बोलता म्हणून मराठी माणूस म्हणतात, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र विकायला काढलाय

आपल्याकडे आमदार खासदार दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे एवढंच सुरु आहे. महाराष्ट्र विकायला काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जातात. शाळात ड्रग्ज जातायत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जातायत. तरुण तरुणी ड्रग्जच्या आहारी जाऊन व्यसनी होत आहेत. ग्रामीण भागात प्रगती होत नाही, तरुण तरुणी शहरात येतात, शहरं बकाल होत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

नोव्हेंबर डिसेंबरमधील 36 दिवसात मुंबईत 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी  ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत नवी मुंबईत 499 त्यातील 41 मुलं बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील पोलिस सक्षम आहेत म्हणून त्या आई वडिलांना मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साडे चार हजार ते साडे पाच हजार मुलं बेपत्ता होतात, असा महाराष्ट्र होता का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

हेदेखील वाचा

Comments are closed.