देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो अन्…; राज ठाकरे अमित साटमांवर स
राज ठाकरे अमित साटमवर मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या किंवा खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चेंबूर येथे 29 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे एका 11 वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला होता. तर साकीनाका येथे 2 जुलै रोजी एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला. या दोन दुर्दैवी घटनांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर सर्व स्तरातून तीव्र टीका होत आहे. सामान्य मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच, लोकप्रतिनिधींमध्ये मात्र या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
मुंबईतील विधिमंडळात सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू आहे. या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी चर्चा झाली. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनाविरोधात कमालीची नाराजी व्यक्त केली. मात्र, याच दरम्यान भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये झाड कोसळण्याच्या आणि मॅनहोलच्या घटनांचा उल्लेख सुरू असताना अमित साटम हसताना दिसत आहेत. या असंवेदनशीलतेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट फेसबुक पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Raj Thackeray: भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आलाय
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे? आणि तुम्ही तू पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे.
Raj Thackeray on Ameet Satam: तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो
तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
Raj Thackeray on Devendra Fadnavis: तेव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते
राज ठाकरे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली 37 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
Raj Thackeray on Devendra Fadnavis: तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . (बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिंमत झाली नसती. पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.