हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!

महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट: आज 1 मे महाराष्ट्र दिन… महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) राज्यातील सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालयं आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट करण्यात आली. सरकारी इमारती तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्यात…आज 1 मेचा दिवस अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मोठं यश आल्यानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची, शौर्याची आणि अभिमानाची आठवण म्हणून 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्र दिनानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्टही राज ठाकरेंनी केली आहे. (Raj Thackeray Post On Maharashtra Din)

राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray Post On Maharashtra Din)

सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा दिवस या  हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी हुतात्मा स्मारकाजवळ काय बघितलं? (Raj Thackeray Post On Hutatma Chowk)

राज ठाकरे पुढे म्हणाले की, हुतात्मा स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे?, वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल, असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.

सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय?- राज ठाकरे (Raj Thackeray Post On Maharashtra Din)

मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.

संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका- राज ठाकरे (Raj Thackeray Post On Maharashtra Din)

माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून 1 मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल. मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील, असंही राज ठाकरे पोस्टद्वारे म्हणाले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.