राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाचा प्लॅन सांगितला, प्रत्येक घरात जाऊन…
राज ठाकरे मतदार यादीत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीतील नोंदणीची प्रक्रिया जून महिन्यात बंद करुन त्यामध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाद मागायला गेल्यावर सत्ताधारी गटातील (Mahayuti) नेते आमच्यावर टीका करतात. आपण शेण खाल्लंय हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या मनाला आमच्या आरोपांचा त्रास होतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या यादीप्रमुखांना एक महत्त्वाची सूचना दिली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रत्येक घरामध्ये जा आणि तपासणी सुरु करा. मतदार यादीतील लोक तिकडे खरंच राहतात का, हे बघा. मी यासाठीच आज मनसेच्या सर्व यादीप्रमुखांना आज बोलवले आहे. घराघरात जा. माझी मतदारांना विनंती आहे की सहकार्य करा. जेणेकरुन सत्ताधाऱ्यांनी जे शेण खाल्लंय ते सगळं बाहेर येईल. आधीच पाच वर्ष होऊन गेली आहेत, आणखी एक वर्ष निवडणूक झाली नाही तरी हरकत नाही. पण मतदार यादी स्वच्छ झाल्याशिवाय आणि समाधान झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. मतदार यादी स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, मी बघतोच निवडणुका कशा होतात त्या, असे सांगत राज ठाकरे यांनी दंड थोपटले.
या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक जुना व्हिडीओ लावला होता. यामध्ये मोदींनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. तसेच राज यांनी महायुतीच्या काही नेत्यांचे व्हिडीओ दाखवून मतदार यादीत कशाप्रकारे प्रचंड फेरबदल करण्यात आले आहेत, हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
Raj Thackeray: भाजपच्या मराठी मतदारांना राज ठाकरेंचा इशारा
मी बुलेट ट्रेनला विरोध केला होता तो पट्टा बघा, भौगोलिक पट्टा बघा आहे. तिथे आता नवे विमानतळ तयार करतील, सांताक्रुझचे विमानतळ आहे, तेथील सगळे ऑपरेशन कमी करणार आणि ते नवी मुंबईला नेणार. इथले सगळे कार्गो काढणार आणि वाढवणला नेणार आणि मग सगळी जमीन अदानीच्या घशात घालणार, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच, भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, हा गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्या खाली घेतले जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
Maharashtra Voters list: मतदार यादीत बोगस लोक घुसवल्यावर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार? राज ठाकरेंचा सवाल
यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाहीत, असे सत्ताधारी म्हणत असतात. त्यांचा एकही आमदार आणि खासदार नाही, असेही म्हटले जाते. पण अशाप्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.