राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण…. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या

मुंबई: राज्यसभेसाठी (Rajyasbha Election 2026) राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देण्यासाठी विधानपरिषदेतील एका जागेवर काँग्रेस दावा करणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी शरद पवार यांना समर्थन देता येईल परंतु मविआ म्हणून विधान परिषदेत देखील एक जागा सोडण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविआ एकत्र चर्चा करत निर्णय घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.(Rajyasbha Election 2026)

काँग्रेसची वेट अँड वॅाचची भूमिका

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत राज्यसभेसाठी निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबतीत मविआत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेकरता पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसची वेट अँड वॅाचची भुमिका असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास काँग्रेस वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह एकूण ३७ जागांसाठी बुधवारी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी महविकास आघाडीची एकजूट महत्त्वाची असेल.

मतांचे गणित कसं असेल?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.

पुन्हा शरद पवारांना संधी मिळणार का?

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पवार यांना काँग्रेस आणि उद्धवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो. मात्र, वाढलेले वय आणि प्रकृती लक्षात घेता पवार राज्यसभेवर जातील का ? हा प्रश्न आहे. पवारांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर आघाडीला सहमतीचा उमेदवार द्यावा लागेल.

भाजपचे धक्कातंत्र ?

राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. तसेच केंद्रात मंत्री असल्याने भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

कुणाचे किती संख्याबळ ?

भाजप – १३१

शिंदेसेना – ५७

राष्ट्रवादी (अजित पवार) – 40

उद्धवसेना – २०

काँग्रेस – १६

राष्ट्रवादी (शरद पवार) – १०

अपक्ष आणि इतर – १२

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत. शिंदेसेनेत माजी खासदार राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा. अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.