RCB vs LSG: रसिक सलाम सोबत अन्याय झाला? 4 विकेट्स घेऊनही 'सामनावीर' पुरस्कार मिळाला नाही!

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 एप्रिल रोजी आयपीएल 2026 मध्ये आपला चौथा विजय नोंदवला. त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सवर 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ संघाला केवळ 146 धावाच करता आल्या. लखनऊच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली असली, तरी आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक लाईन आणि लेंथ सह प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे रोखून धरले. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवुड आणि रासीख सलाम या तिन्ही गोलंदाजांनी 7 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत सामन्यावर आपला महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. भुवनेश्वरने 2 हेझलवुडने 1 तर रासीख सलामने प्रभावी गोलंदाजी करत 4 बळी टिपले.

आरसीबीने हे माफक आव्हान अवघ्या 15.1 षटकांतच पूर्ण केले. विराट कोहलीने 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, ज्यामुळे संघाचा विजय अत्यंत सहज साध्य झाला.

मात्र, सामन्यानंतर सामनावीर (Player of the Match) पुरस्कारावरून जोरदार चर्चा आणि वादविवाद सुरू झाले आहे. रासीख सलामची गोलंदाजीची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट असूनही, हा पुरस्कार जोश हेझलवुडला मिळाल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. हेझलवुडने 4 षटकांत 20 धावा देत 1 बळी घेतला होता, तर रासीख सलामने केवळ 24 धावांत 4 बळी मिळवले होते.

रासीख सलामने एडन मार्करम, आयुष बदोनी, मुकुल चौधरी आणि आवेश खान या फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे, त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये (death overs) अत्यंत अचूक गोलंदाजी केली आणि दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले.

दोन्ही गोलंदाजांची आकडेवारी पाहता, हेझलवुडने 10 डॉट बॉल्स टाकले होते, तर रासीखने 8. तरीही, बळींच्या संख्येचा विचार करता, रासीख स्पष्टपणे आघाडीवर होता. परिणामी, अनेकांच्या मते, सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी रासीख सलामच होता.

आयपीएलमध्ये, सामनावीर पुरस्काराची निवड सामन्यानंतर समालोचक मंडळ (Commentary Panel) आणि अधिकृत प्रसारकाद्वारे केली जाते. यामध्ये माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ञांचा समावेश असतो. हे सदस्य सामन्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूची निवड करतात.

Comments are closed.