Ratnagiri News – संकष्ट चतुर्थीनिमित्त आंजर्लेच्या ‘कड्यावरील गणपती’ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बुधवारी (10 जून 2026) आलेल्या संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून, दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंजर्ले येथील ‘कड्यावरील गणपती’ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर व्यवस्थापन कमिटीने केलेल्या उत्तम आणि नेटक्या नियोजनामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता सुलभतेने बाप्पाचे दर्शन घेता आले.

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील श्री गणपती देवस्थान हे अत्यंत सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. या गावाचे मूळ नाव ‘अजरालय’ असे होते, परंतु काळाच्या ओघात ते ‘आंजर्ले’ म्हणून प्रचलित झाले. गावातीलच एका निसर्गरम्य टेकडीवर हे भव्य ‘कड्यावरील गणपती मंदिर’ वसलेले आहे. येथील श्रीगणेशाची मूर्ती अत्यंत देखणी आणि मनमोहक असून, तिच्या दर्शनाने भाविकांच्या मनाला असीम शांतता आणि समाधान लाभते. याच श्रद्धेपोटी स्थानिक भाविकांसह राज्यभरातून आणि दुरून येणाऱ्या भक्तगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

बुधवारी (३ जून) संकष्ट चतुर्थी असल्याने दापोली परिसर आणि पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात हजेरी लावली होती. तसेच, सध्या पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांनीही कड्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास मंदिरात झालेल्या विशेष महाआरतीचा लाभ शेकडो भाविकांना घेता आला. महाआरतीच्या वेळचे भक्तिमय वातावरण आणि बाप्पाचे विलोभनीय रूप डोळ्यात साठवून परतणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळत होते.

Comments are closed.