Ratnagiri News – उन्हाळी सुट्टीनिमित्त मामाकडे गेलेल्या भाच्याचा धरणात बुडून मृत्यू, चिपळूणमध्ये हळहळ
उन्हाळी सुट्टीनिमित्त मामाच्या गावी गेलेल्या भाच्याचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वराज्य संदीप शिंदे (16) असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
चिपळूण तालुक्यातील ओवळी गावातील रहिवासी असलेल्या स्वराज्यने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर तो सुट्टीनिमित्त कोल्हापुरातील कळंबा येथे मामाच्या गावी गेला होता. बुधवारी तो मामा आणि त्याच्या मित्रांसोबत दूधगंगा नदीवरील काळमावाडी धरण परिसरात सहलीला गेला होता.
दूधगंगा नदीच्या पात्रात सर्वजण पोहण्यासाठी उतरले असता स्वराज्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने सोबत असलेल्यांनी त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. अखेर या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती, मात्र गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी 10 च्या सुमारास काळोख्या डोहातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक शेळके आणि किरण पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
स्वराज्य हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीस असून त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने ओवळी गावावर शोककळा पसरली आहे.
Comments are closed.