नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, कडब्याचे ढिगारे आणि जलजीवन योजनेचे पाईप जळून खाक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक घर, दोन कडब्याचे ढिगारे आणि जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाईप जळून खाक झाल्याची घटना 30 एप्रिल रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग पसरू नये म्हणून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. मात्र आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने ग्रामस्थांनी तातडीने नायगावच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांना घटनेची माहिती दिली.

तहसीलदारांनी तत्काळ नायगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवार यांना सूचना देत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले. मात्र नगरपंचायत प्रशासनाकडून “गाडीत डिझेल नाही” किंवा “पाणी भरायचे आहे” अशी कारणे देत विलंब झाला असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दिरंगाईमुळे आग नियंत्रणात आणण्यास उशीर झाला आणि कडब्याचे दोन्ही ढिगारे, जलजीवन योजनेचे पाईप तसेच जवळील जुन्या घरातील साहित्य पूर्णपणे जळून गेले.

या घटनेमुळे नायगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्क्रिय प्रशासनावर कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून संबंधितांना भरपाई द्यावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.