Ratnagiri News – मांजरे परिसरात गवा रेड्यांचा धुमाकूळ; गव्यांच्या कळपामुळे शेती, बागायतींचे नुकसान
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे परिसरात गवा रेड्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ ते ८ गवा रेड्यांचा कळप सकाळच्या सुमारास मांजरे परिसरात पुन्हा दिसून आला असून, या कळपाने भातशेतीसह आंबा आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मांजरेसह मेढे, बोन्डे, नारशिंगे, उपळे आणि डावखोल, आगवे, विल्ये या गावांमध्येही गवा रेड्यांचा नियमित वावर दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी लवकर शेतीच्या कामासाठी बाहेर पडताना भीती वाटत असून, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि पिकांचे सातत्याने होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. भात, आंबा आणि काजू बागांचे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी कठीण बनले असून, वन विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून गवा रेड्यांच्या वावरावर नियंत्रण आणावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गवा रेड्यांचा कळप वारंवार गावालगतच्या शेतांमध्ये येत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.