कोकणची पोरं हुश्शार! सलग पंधराव्या वर्षी राज्यात अव्वल, दहावीचा 97.62 टक्के निकाल जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी संकेतस्थळावर जाहिर झाला. राज्यात कोकण बोर्डाने सलग पंधराव्या वर्षी अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 97.62 टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 98.13 टक्के निकाल लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा 97.37 टक्के निकाल लागला आहे.

कोकण बोर्डात दहावी परीक्षेसाठी 25 हजार 172 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 24 हजार 573 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 12 हजार 925 मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी 12 हजार 503 जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.73 टक्के आहे. 12 हजार 247 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 12 हजार 70 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.55 टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8 हजार 735 मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी 8 हजार 430 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.50 टक्के आहे. 8 हजार 286 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 8 हजार 144 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.28 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 हजार 190 मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी 4 हजार 73 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.20 टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 हजार 961 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 3 हजार 926 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.11 टक्के आहे.

शून्य प्रत प्रकार

कोकण बोर्डात दहावीच्या परीक्षेत एकही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही. परीक्षेत्तोर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी दोन गैरप्रकार घडले आहेत. त्यामध्ये उत्तरपत्रिकेची पाने फाडणे किंवा मला पास करा अशी विनंती करण्याचे प्रकार आढळून येतात.

कोकण बोर्डात सात जणांना शंभर टक्के गुण

दहावीच्या परीक्षेत सात विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 4 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. फाटक हायस्कूलच्या पर्णिका प्रणव परांजपे आणि नवेली सचिन भिंगार्डे यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निकालात घट

बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल 98.82 टक्के होता तो यंदा 97.62 टक्के इतका लागला आहे. यंदा निकालात 1.2 टक्क्यांनी घट झाली आहे.

Comments are closed.