Ratnagiri News – जामदा प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू, 75 हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण
राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला असून, प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला देण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून, भूसंपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
जामदा प्रकल्पासाठी काजिर्डा आणि राणेवाडी या दोन महसुली गावांतील काही मिळकती संपादन प्रक्रियेत समाविष्ट आहेत. या जमिनींचे भूसंपादन गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या विविध शंका व अडचणींचे निरसन केल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. काजिर्डा गावातील सुमारे २०२ हेक्टर, तर राणेवाडी येथील सुमारे ३३ हेक्टर क्षेत्र प्रकल्पासाठी शासनाकडून संपादित करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्यामुळे काजिर्डा व राणेवाडी येथील बुडीत क्षेत्रापैकी सुमारे ७५ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. ३० जून २०२६ पूर्वी हे मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित क्षेत्राची मोजणी करून घेण्यासाठीही प्रकल्पग्रस्तांकडून सहकार्य मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जलसंपदा विभागामार्फत मौजे मूर येथील ‘मूर पुनर्वसन सांडवा’ प्रस्तावांतर्गत सुमारे ३३ हेक्टर, तर काजिर्डा येथील ‘ब्राम्हणखोरे पुनर्वसन गावठाण’ प्रस्तावांतर्गत सुमारे २६ हेक्टर क्षेत्र शासनाकडून अधिग्रहित केले जात आहे. यापैकी काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला वितरित करण्यात आला असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.जामदा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सवलतींसह भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भूसंपादनाबरोबरच पुनर्वसनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे.
भूसंपादन, संयुक्त मोजणी, मोबदला वाटप आणि पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जामदा प्रकल्पाला प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने गती मिळू शकते. सध्या मोबदला वाटप सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण करून प्रशासनाकडून प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Comments are closed.