गणेश विसर्जनादरम्यान तरुणाचा मृत्यू, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची बविआची मागणी
गणेश विसर्जनादरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. प्रज्वल पुरुषोत्तम घडशी असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निष्काळजी आणि बेजबाबदार ठेकेदारावर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीबाबत बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शनिवार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी माभळे गावातील ग्रामस्थ गणपती विसर्जनासाठी सोनवी नदीपात्रात उतरले होते. यादरम्यान सोनवी नदीपात्रातील गणेश घाटाजवळ ठेकेदाराने खणलेल्या 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात प्रज्वल पाय घसरून पडला आणि पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील व इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु प्रज्वलचा बुडून मृत्यू झाला. मृत प्रज्वल हा फार्मसी पदवीचे शिक्षण घेत होता. या घटनेमुळे माभळे गावावर शोककळा पसरली आहे.
च्या
महामार्ग चौपदरीकरणाच्या भरावासाठी संबंधित ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता सोनवी नदीतील गाळ बेकायदेशीरपणे उपसला होता. ज्यामुळे नदीपात्रात 25 ते 30 फूट खोल खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदार आणि प्रशासनाकडे वारंवार लेखी पाठपुरावा व प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. मात्र, ठेकेदार आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे या निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
Comments are closed.