पराभव विसरून आरसीबी-गुजरात आमने-सामने अव्वल चार संघांत स्थान राखण्यासाठी होणार संघर्ष
चिन्नास्वामीच्या मैदानावर पुन्हा एकदा धावांचा स्पह्ट होणार की फलंदाजांची पुन्हा घसरण होणार? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी होणारी लढत म्हणजे दोन्ही संघांच्या फलंदाजीची खरी कसोटी ठरणार आहे. मागील पराभवाच्या जखमा अजून भरलेल्या नसतानाच दोन्ही संघ आता विजयासाठी झुंज देण्यास सज्ज झाले आहेत.
दिल्ली पॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चिन्नास्वामीच्या संथ खेळपट्टीने बंगळुरूच्या फलंदाजांची परीक्षा घेतली आणि ती ते नापास ठरले. परिणामी सहा विकेट राखून पराभव पत्करावा लागला. हा हंगामातील दुसरा धक्का बसल्याने अव्वल चारमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याची सुवर्णसंधी त्यांनी गमावली. सध्या आठ गुणांसह तिसऱया स्थानावर असलेल्या बंगळुरूसाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा महत्त्वाचा ठरणार आहे.
गुजरातची फलंदाजीही चिंतेत
दुसरीकडे गुजरात टायटन्सची अवस्था काही वेगळी नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संपूर्ण संघ अवघ्या 100 धावांत गारद झाला आणि 99 धावांनी नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. शुभमन गिल आणि यांनी जोस बटलर काही प्रमाणात सातत्य दाखवले असले, तरी साई सुदर्शन , ग्लेन फिलीप्स आणि राहुल तेवतिया यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. त्यामुळे गुजरातची फलंदाजी अजूनही अस्थिर दिसत आहे.
आरसीबीसमोर ‘प्लॅन बी’चा प्रश्न
गतविजेत्या बंगळुरूला हे चांगलेच उमगले आहे की, फक्त आक्रमक फलंदाजीवर विसंबून चालणार नाही. दिल्लीविरुद्ध फिल सॉल्ट वगळता कोणताही फलंदाज आपला ठसा उमटवू शकलेला नाही. रजत पाटीदार,टीम डेव्हिडसारख्या फटकेबाजांनाही धावा काढताना संघर्ष करावा लागला. आता या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांना ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा लागणार आहे. कारण प्रत्येक वेळी फक्त आक्रमक खेळ यशस्वी होईलच, याची हमी नाही. परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची तयारीच त्यांना विजयाच्या दिशेने नेऊ शकते.
Comments are closed.