अहिल्यानगरमध्ये ‘मस्साजोगची पुनरावृत्ती’; आधी अपहरण केलं, नंतर गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून मारह
अहिलीनगर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही, तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. एकीकडे गुन्हेगारीने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. बीडमधील मस्साजोगची घटना ताजी असतानाच अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष पध्दतीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह डोंगरामध्ये नेत तो जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या नऊ नराधमांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (19, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूज ऊर्फ गोट्या (वय 19, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते. संदेशला त्याच्या घरून कारमध्ये घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन नवीन गटारीसाठी काढलेल्या एका चेम्बरमध्ये कोंबून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मारहाणीचा व्हिडीओ काढला. तेथून त्याला नागापूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारीला संदेशच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा मेसेज आला, म्हणून आरोपींनी संदेशला वैभव नायकोडीला फोन करायला सांगितला. संदेशने वैभवला फोन करून तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलवलं.
आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून वैभव ज्या सलूनच्या दुकानावर थांबला होता तेथे नेले. नायकोडीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींनी दोघांना पुन्हा निर्जनस्थळी नेलं आणि पुन्हा एकदा चेम्बरमध्ये घालून मारहाण केली. त्या रात्री दोघांनाही पुन्हा फ्लॅटमध्ये ठेवलं. तेथे आरोपींनी दोघांना मॅगी खाण्यासाठी दिली. संदेश दिलेली मॅगी खाल्ली, पण वैभवने नकार दिला. म्हणून, त्याला पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला आरोपींनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचं लक्षात येताच त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताईच्या डोंगरात नेऊन जाळून टाकलं. त्यानंतर आरोपींनी संदेशला घडल्या प्रकाराबाबत कोठे न बोलण्याची धमकी देत सोडून दिलं. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेशने पोलिस ठाण्यात जाऊन सर्व हकीगत सांगितली आहे.
तरूणाची हत्या का केली?
तरुणांच्या दोन टोळीमध्ये वाद होता. गेल्या 19 जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशी याच्यावर एक अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर पाच साथीदारांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी व संदेश हे दोघे सोमवंशीला मारहाण करणाऱ्या टोळीसोबत राहतात, या रागातून त्यांचे अपहरण केले होते. त्यांतर मारहाण केली, या घटनेत एकाचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Comments are closed.